Long-awaited elections of the Pimpri-Chinchwad Municipal Corporation have finally been cleared to proceed. – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बहुप्रतिक्षित निवडणुकांचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. प्रशासनाने ३२ प्रभागांची चार सदस्यीय रचना तयार केली असून, या रचनेनुसार प्रत्येक प्रभागातून चार नगरसेवक निवडले जाणार आहेत. ही रचना राज्य शासनाच्या नगर विकास विभागाकडे पाठविण्यात येणार असून, त्यानंतर अंतिम मंजुरीनंतर निवडणूक प्रक्रिया पुढे जाईल. विशेष म्हणजे, २२ ऑगस्ट रोजी या प्रभागांचे नकाशे अधिकृतपणे नागरिकांसाठी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रभाग रचना कशी आहे, कोणता परिसर कुठल्या प्रभागात गेला आहे, हे नागरिक, इच्छुक उमेदवार आणि माजी नगरसेवक पाहू शकतील. त्यानंतर हरकती व सूचना नोंदविण्याची संधी दिली जाईल. या निर्णयामुळे राजकीय घडामोडींना वेग आला असून, अनेक पक्षांनी अंतर्गत बैठका आणि रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. गेली काही वर्षे प्रशासकाच्या देखरेखीखाली महापालिकेचे कामकाज चालू होते. त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. प्रभागरचनेनुसार निवडणूक रणनीतीत मोठे बदल होण्याची शक्यता आहे.
गेल्या सात वर्षांपासून निवडणुकांची वाट पाहिली जात होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आता निवडणुका होणार असल्याने, महापालिका प्रशासनाने ही प्रक्रिया वेगाने पूर्ण केली आहे. २०११ च्या जनगणनेनुसार प्रभागातील मतदारसंख्या निश्चित करण्यात आली आहे. त्यासाठी गुगल अर्थ मॅपचा वापर करून आणि आवश्यकतेनुसार प्रत्यक्ष पाहणी करून प्रगणक गट (ब्लॉक) जुळवून प्रभागांचे नकाशे तयार करण्यात आले आहेत.
महापालिकेच्या समितीने तयार केलेल्या या प्रभाग रचनेवर महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी स्वाक्षरी केली असून, आज मंगळवार (दि. ५ ऑगस्ट) रोजी हा अंतिम आराखडा राज्य शासनाच्या नगर विकास विभागाकडे पाठवण्यात येणार आहे. पुढील टप्प्यात, नगर विकास विभाग हा आराखडा ६ ते ११ ऑगस्ट या कालावधीत राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करणार आहे. त्यानंतर निवडणूक आयोग प्रभाग रचनेची छाननी करून, त्यावर हरकती आणि सूचनांसाठी नागरिकांसमोर तो प्रसिद्ध करेल. ही प्रक्रिया पार पडल्यानंतर अंतिम प्रभागनिहाय रचना निश्चित होईल आणि महापालिका निवडणुकीचा मार्ग अधिकृतपणे खुले होईल. त्यामुळे प्रशासन, राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवार यांच्यात प्रचंड हालचाल आणि तयारी सुरू झाली आहे.
प्रारूप प्रभाग रचना २२ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झाल्यानंतर, नागरिकांना आपल्या सूचना आणि हरकती नोंदवण्यासाठी संधी दिली जाईल. सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ ऑगस्टपर्यंत हरकती व सूचना स्वीकारल्या जातील आणि २९ ऑगस्टपासून त्यावर सुनावणी सुरू होईल. या प्रक्रियेमुळे लवकरच निवडणुका होण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे
