सहकार मंत्री बाबासाहेब पाटील चोपडा पीपल्स बँकेच्या घोडगाव शाखेच्या उद्घाटनासाठी आले असताना, चोपडा तालुक्यातील शेतकऱ्यांची भीषण अवस्था लक्षात आणून देण्यासाठी शेतकरी कृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले.
या निवेदनात मंत्री महोदयांनी शक्य असल्यास प्रत्यक्ष शेतांवर जाऊन पाहणी करावी, म्हणजे चोपडा तालुक्यातील सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची खरी स्थिती लक्षात येईल, अशी विनंती करण्यात आली.
निवेदनात नमूद करण्यात आले की, “२४ तासांत ६५ मिमी पाऊस नाही” हा अतिवृष्टीचा निकष लावून शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवू नये. जसे इतर तालुक्यांमध्ये ही अट शिथिल केली आहे, तसेच चोपडा तालुक्यासाठीही ती शिथिल करण्यात यावी.
यावेळी जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार यांनी देखील मंत्री महोदयांना या विषयात लक्ष घालण्याची विनंती केली. तसेच संपूर्ण कर्जमाफीची मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली.
निवेदनावर एस. बी. पाटील, शशिकांत देवरे, शशिकांत पाटील, ललित बागुल आणि बाळासाहेब पाटील यांच्या सह्या आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: आत्माराम पाटील, चोपडा
