नाशिक, दि.२ मे २०२० : नाशिक जिल्ह्यात अडकलेले ८५० परप्रांतीय कामगार, नागरिक यांना आज विशेष श्रमिक रेल्वेने उत्तर प्रदेश मधील लखनौला रवाना करण्यात आले.
लॉकडाऊन झाल्यापासून आपापल्या गावी निघालेले हे परप्रांतीय नागरिक मुंबई येथून ट्रक, डंपरमध्ये बसून अथवा पायी असा जीव घेणा प्रवास करत होते.
नाशिक शहर पोलिसांनी या नागरिकांना अडवून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेल्टर होममध्ये क्वारंटाइन केले होते.
अशा ८५० लोकांना आज(शनिवार) सकाळी नाशिकरोड वरून विशेष रेल्वेने त्यांच्या गावी रवाना करण्यात आले. शहरातील नाशिक – पुणे रोड, आनंदवली येथील मनपाच्या शाळा , यांसह इतरत्र ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य तपासणी करुन क्वारंटाइन करुन ठेवण्यात आले होते.
याबाबत केंद्रशासनाच्या आदेशानुसार, शेल्टर होममधील नागरिकांना त्यांच्या राज्यात पाठवण्याचे आदेश प्राप्त झाल्याने राज्य सरकार आणि भारतीय रेल्वे यांच्या समन्वयाने ही श्रमिक रेल्वे सेवा सुरू करण्यात आली आहे.
शाळकरी मुलांच्या बसमधून या नागरिकांना नाशिकरोड इथं आणण्यात आल्याने रेल्वे स्टेशनला छावणीचे स्वरूप आले होते. या सर्व लोकांची शेलटरच्या ठिकाणीच जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.
तीन आठवडयानंतर आपापल्या गावी जाण्यासाठी व्यवस्था करण्यात आल्याने सर्व परप्रांतीय नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. शिवाय जाताना सर्व परप्रांतीय नागरिकांनी जय महाराष्ट्र म्हणत सरकारचे आभार मानले. सरकारचे यावेळी टाळ्या वाजवून अभिनंदन देखील करण्यात आले आहे.
छगन भुजबळ यांनीही या परप्रांतीय कामगार नागरिकांना निरोप दिला. या सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी केली असून त्यांनी त्याच्या गावी सुखरूप जावे अशा शुभेच्छा दिल्या. यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यासह जिल्हाधिकारी सुरज मांढरे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील उपस्थित होते.
न्युज अनकट प्रतिनिधी: