मुंबई, १५ ऑक्टोंबर २०२२ : महाराष्ट्रातील ठाकरे कुटुंबातील आणखी एका सदस्याने निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे संकेत दिले आहेत. भविष्यात निवडणूक लढवू शकतो, असं वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपूत्र अमित ठाकरे यांनी केलं आहे.
अमित ठाकरे सध्या महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांचा दौरा करत आहेत. विविध भागांमध्ये जाऊन ते कार्यकर्त्यांच्या भेटी घेत आहेत. जोरदार स्वागत त्यांचं ठिकठिकाणी केलं जात आहे. अशाच दौऱ्यादरम्यान वृत्तवाहिनीला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी निवडणूक लढवण्याचे संकेत दिले. सध्याची राजकीय परिस्थिती, मनसेची पुढील वाटचाल याबाबत त्यांनी मुलाखतीत भाष्य केलं आहे.
मनसेचा बॅड पॅच संपला आहे. वेळ आल्यास आपणही विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरू,” असं विधान अमित ठाकरे यांनी या वेळी केलं आहे. आगामी निवडणुकीसाठी अमित ठाकरे सज्ज असल्याचे त्यांच्या विधानावरुन स्पष्ट झाले आहे. खरी शिवसेना कुणाची, यावरुन राज्यात शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात कलगीतुरा रंगला आहे, तर हा मुद्दा सद्या न्यायालयात आहे.
या संदर्भात अमित ठाकरे यांना विचारले असता ते म्हणाले, “बाळासाहेबांसाठी वाईट वाटले. बाकी कुणासाठी काही वाटले नाही. मी फक्त माझ्या कामावर लक्ष देतो. दसरा मेळावादेखील पाहायला मी गेलो नाही. जनतेकडून आम्हाला मिळणारे प्रेम बघून डोळ्यांत पाणी येतं, अशी भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपण निवडणूक लढवणार नाही अशी घोषणा केली आणि ती खरी करुन दाखवली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मात्र आपल्याला मुख्यमंत्री व्हायला आवडेल अशी भूमिकाही जाहीर केली होती.
पण त्यांनी निवडणूक कधी लढवली नाही. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे मुंबईतील वरळी मतदारसंघातून निवडणुकीला सामोरे गेले आणि निवडणूक लढवणारे ते पहिले ठाकरे ठरले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडे मुख्यमंत्रिपद आलं आणि ते विधानपरिषदेवर निवडून गेले. आता अमित ठाकरे यांनी गरज पडली तर मी सुद्धा निवडणूक लढवेन, असे विधानं केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे