उस्मानाबाद, २९ ऑक्टोंबर २०२२: उस्मानाबाद येथे सुरू असलेले शेतकरी पीक विम्यासाठी सुरु असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. पीक विम्याची रक्कम विमा कंपन्या कडून मिळवण्यासाठी, ठाकरे गटाकडून आज उस्मानाबाद बंदची हाक देण्यात आली होती. दरम्यान, उस्मानाबादमध्ये अज्ञातांकडून एसटी बस फोडण्यात आल्या. उस्मानाबाद शहरातील तेरणा कॉलेजसमोर आंदोलकांनी टायर जाळले. यामुळे उस्मानाबाद एसटी बस आगाराच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
आमदार कैलास पाटील यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे. शेतकऱ्यांसाठी सुरु केलेल्या या आंदोलनाचे तीव्र पडसाद आता उस्मानबादमध्ये उमटू लागले आहेत. शहरामध्ये सध्या तणावपूर्ण वाचावरण दिसून येते आहे. उस्मानाबाद शहरातील एसटी डेपोतील वाहतूक धीम्या गतीने सुरु आहे. त्याचबरोबर तणावाच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेक शेतकरी आमदार कैलास पाटील यांच्या उपोषण आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आले असून, सध्यस्थीतीत उस्मानाबादेतली पीक विम्याचे आंदोलन आता चिघळत असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान आमदार कैलास पाटील यांच्या आंदोलनामुळे मुजोर विमा कंपन्या वठणीवर येतील अशा भावना शेतकऱ्यांच्यात उमटू लागल्या आहेत.उस्मानाबादचे जिल्हाधिकारी डॉ. सचिनओंबसे यांनी उर्वरीत ३७३ कोटी रुपयांच्या वसुलीसाठी पुण्यातील कंपनीची संपत्ती जप्त करण्याचे आदेश काढले असून विमा कंपनीची संपत्ती जप्त करण्याचे पत्र पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले असल्याचे समजते.
न्युज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर