गोल पोस्ट आंतरराष्ट्रीय पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा मध्ये जोरदार बॉम्ब स्फोट, स्फोटात ४४ लोकांचा मृत्यू तर...

पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा मध्ये जोरदार बॉम्ब स्फोट, स्फोटात ४४ लोकांचा मृत्यू तर १५० जण जखमी

खैबर पख्तूनख्वा, ३१ जुलै २०२३ : पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा येथे रविवारी जोरदार बॉम्ब स्फोट झाला. या स्फोटात ४४ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर १५० जण जखमी झाले आहेत. हा बॉम्ब स्फोट खैबर पख्तूनख्वाच्या बाजौर जिल्ह्यातील खार तालुक्यात झाला आहे. जमीयत उलेमा इस्लाम फजलच्या (जेयुआयएफ) रॅलीवेळी हा बॉम्ब स्फोट झाला. या स्फोटात जेयुआयएफ चा प्रमुख मौलाना जियाउल्लाह जान यांचा मृत्यू झाला आहे. हा स्फोट अत्यंत शक्तीशाली होता. स्फोट होताच लोक प्रचंड घाबरले आणि दिसेल त्या बाजूला सैरावैरा धावत होते. या स्फोटाने पाकिस्तान पुरता हादरून गेला आहे.

पाकिस्तानी मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, जमीयत उलेमा इस्लाम फजलचा नेता मौलाना जियाउल्लाह जान यांचा बॉम्ब स्फोटात मृत्यू झाला आहे. या स्फोटातील जखमींना तात्काळ पेशावर आणि टिमरगेरा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ज्या ठिकाणी बॉम्ब स्फोट झाला त्या ठिकाणी तात्काळ मोठा बंदोबस्त वाढवण्यात आला होता. तसेच घटनास्थळी रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या होत्या. या रुग्णवाहिकांमधून मृतदेह आणि जखमींना तात्काळ रुग्णालयात नेले जात होते.

दरम्यान जेयूआयएफचे नेते मौलाना फजलूर रहमान यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि स्थानिक सरकारकडे या हल्ल्याच्या चौकशीची मागणी केली आहे. तसेच या स्फोटानंतर जेयूआयएफच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी रुग्णालयात धाव घेऊन रक्तदान करण्याचे आवाहनही केले. हा मानवतेवरील हल्ला असल्याची प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करण्यात आली आहे.

या हल्ल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ अत्यंत धक्कादायक आहे. जमीयतच्या रॅलीत मोठ्या प्रमाणावर लोक जमले होते. मंचावर पक्षाच्या नेत्यांची भाषणे सुरू होती. यावेळी जमावाकडून जिंदाबाद, जिंदाबादच्या घोषणा दिल्या जात होत्या. हजरत मौलाना अब्दुल रशीद साहब जिंदाबाद, जिंदाबाद अशा घोषणा कार्यकर्त्यांनीही देण्यास सुरुवात केली.

घोषणांचा हा धुंवाधार पाऊस सुरू असतानाच अचानक प्रचंड मोठा आवाज आला. बॉम्ब स्फोट झाल्याबरोबर आग आणि धुळीचे लोट आकाशाच्या दिशेने उडाले. सर्वत्र धूरच धूर झाला होता. धूर आणि धुळीमुळे समोरचे काहीच दिसत नव्हते. प्रचंड मोठा आवाज आल्याबरोबर लोकांनी दिसेल तिकडे पळण्यास सुरुवात केली. एकमेकांच्या अंगावर लोक पडत होते. चेंगराचेंगरी झाली. संपूर्ण परिसरात अफरातफरी माजली होती.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

error: Content is protected !!
Exit mobile version