बाणेर परिसरातील वीजपुरवठा अधिक सक्षम आणि विश्वासार्ह बनवण्यासाठी महत्त्वपूर्ण तांत्रिक कामे यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली आहेत. यामुळे, परिसरातील वीज वितरण प्रणालीची क्षमता वाढली असून, ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा मिळणार आहे.
गेल्या १२ वर्षांपासून बाणेर शाखा २२/२२ केव्ही युथिका आणि २२/२२ केव्ही वास्कोन ही दोन्ही स्विचिंग स्टेशन एकाच इनकमरवर कार्यरत होती, ज्यामुळे केवळ २७० ॲम्पिअरपर्यंतचा लोड घेणे शक्य होत होते. यामुळे, एका फीडरमध्ये बिघाड झाल्यास दोन्ही स्विचिंग स्टेशनचा वीजपुरवठा खंडित होत असे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी ७ तारखेला १३२ केव्ही ईएचव्ही एनसीएल उपकेंद्रात स्वतंत्र ईएचव्ही बे सेपरेशनचे काम पूर्ण करण्यात आले. विशेष म्हणजे, यासाठी कोणतीही अतिरिक्त एचटी केबल टाकावी लागली नाही.
या कामामुळे आता युथिका आणि वास्कोन स्विचिंग स्टेशनना स्वतंत्रपणे लोड व्यवस्थापन करता येणार आहे. यामुळे प्रत्येक स्टेशनवर १५० ॲम्पिअरने अतिरिक्त लोड घेणे शक्य होईल, ज्यामुळे एकूण वीज वितरण क्षमता वाढेल. याशिवाय, आपत्कालीन परिस्थितीत बेवरली हिल्स बाणेर शाखा आणि कमफर्ट झोन (आयटीआय शाखा) स्विचिंग स्टेशनवरही लोड ट्रान्सफर करता येईल, ज्यामुळे वीजपुरवठा खंडित होणार नाही.
औंध उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता उमेश करपे यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम पूर्ण झाले. या कामात आयटीआय शाखेचे सहायक अभियंता सोमनाथ पठाडे, बाणेर शाखेचे सहायक अभियंता मोमीन तसेच लाईन स्टाफ आणि ऑपरेटर यांनी महत्त्वपूर्ण सहकार्य केले. यामुळे बाणेर परिसरातील हजारो वीज ग्राहकांना भविष्यात अधिक चांगल्या सेवा मिळण्याची शक्यता आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे