बारामती, दि.२८ एप्रिल २०२०: कोरोना वायरस आणि सध्याच्या लॉकडाऊन परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे मानवी जीवन सुकर करण्यासाठी प्रशासन झटत आहे. त्यासाठी अनेक शासकीय योजना, सामाजिक उपक्रमाद्वारे अन्नदान करण्यात येत आहे.मात्र, यामध्ये खऱ्या अर्थाने मुके जीव होरपळले आहेत. या जीवांना आधार देण्यासाठी उपासमारी टाळण्यासाठी नगरपालिका प्रशासन सरसावले आहे.या पार्श्वभुमीवर प्रशासनाने घंटागाडीद्वारे वाया जाणारे शिळे अन्न जमा करण्यास सुरवात केली आहे.
कोरोना रोखण्यासाठी प्रशासनाने राबविलेल्या ‘ बारामती पॅटर्न’ चा सर्वत्र बोलबाला आहे. संपुर्ण बारामती शहर सील करण्यात आले आहे. शहरातील ४४ प्रभागात ४४ नगरसेवक, स्वयंसेवकांची मदत घेवून जीवनावश्यक वस्तु घरपोच करण्यासाठी नागरीकांना सुविधा देण्यात येत आहेत. या उपक्रमाद्वारे नागरीकांनी घराबाहेर पडू नये,यासाठी प्रशासन यशस्वी झाल्याचा दावा करीत आहे. माजी सैनिक देखील पोलीस प्रशासनाबरोबर ‘कोरोना वॉरीअर्स’ म्हणून उतरले आहेत.
त्यापाठोपाठ प्रशासन आता मुक्या जीवांची उपासमार रोखण्यासाठी सरसावले आहे. बारामतीच्या घंटागाडीद्वारे एक उपक्रम राबविण्यात येत आहे. चला एक घास तुमचा मुक्या जिवासाठी, असे या उपक्रमाचे नाव आहे. नागरीकांनी घरात राहीलेले सर्व प्रकारचे शिळे अन्न फेकुन न देता घंटागाडी कर्मचारी यांच्याकडे सुपुर्द करावे. ते भाकरी,चपाती,भात व इतर अन्नभटक्या प्राणीमात्राची भुक भागवु शकते. हे अन्न दान करुन बारामतीकरांनी मोकाट/भटक्या प्राणीमात्रांचा आपणही आधार बनावे,असे आवाहन बारामती नगरपरीषदेच्या वतीने करण्यात आले आहे.
पहिल्याच दिवशी चार पोती शिळे अन्न जमायाबाबत नगरपरीषदेचे आरोग्य निरीक्षक राजेंद्र सोनवणे यांनी “न्युज अनकट” शी बोलताना सांगितले कि, कचरा डेपोसह शहरातील विविध भागात गायी, म्हशींसह भट्क्या कुत्र्यांची उपासमार होताना दिसत आहे.त्यातच घंटागाडीमध्ये अनेकजण शिल्लक अन्न टाकुन देतात.त्यातुन हि संकल्पना सुचली. गुुरुवारी(दि २३) या संकल्पनेचा पहिला दिवस होता.पहिल्याच दिवशी चार पोती शिळे अन्न जमा झाले. घंटागाडीद्वारे जमा झालेले अन्न मुक्या जीवांची भुक भागविण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.नागरीकांनी शिळे अन्न फेकुन न देता जमा करावे,असे आवाहन सोनवणे यांनी केले आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव