गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे आश्वासन नको, कामे करा चाकण ‘ट्रॅफिकमुक्त’ करण्यासाठी नागरिकांचा ‘पीएमआरडीए’वर महामोर्चा

आश्वासन नको, कामे करा चाकण ‘ट्रॅफिकमुक्त’ करण्यासाठी नागरिकांचा ‘पीएमआरडीए’वर महामोर्चा

पुणे-पिंपरी-चिंचवड परिसरातील चाकण औद्योगिक वसाहतीला (MIDC) भेडसावणाऱ्या वाहतूक कोंडी आणि रस्ते समस्येविरोधात ‘ट्रॅफिकमुक्त चाकण कृती समिती’ने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (PMRDA) आकुर्डी येथील कार्यालयावर धडक दिली. “आता केवळ आश्वासने नकोत, कामे मार्गी लावा आणि चाकण परिसर वाहतूक कोंडीमुक्त करा,” अशा संतप्त घोषणा देत हजारो नागरिक आणि उद्योजकांच्या प्रतिनिधींनी महामोर्चा काढला.

चाकणमधील संग्रामदुर्ग किल्ल्यापासून निघालेल्या या मोर्चात खासदार अमोल कोल्हे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार बाबाजी काळे यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी सहभागी झाले होते. चाकण परिसरात झालेल्या १७०० अपघाती मृत्यू आणि पीएमआरडीएने केवळ कागदावर ठेवलेल्या रुंद रस्त्यांच्या आरक्षणाचा मुद्दा आंदोलकांनी तीव्रतेने मांडला.

बैठकीत प्रश्नांचा भडीमार, अधिकारी निरुत्तर!

कार्यालयावर पोहोचलेल्या शिष्टमंडळाने पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत प्रश्नांचा भडीमार करत विकास कामांमधील दिरंगाई आणि निकृष्ट कामांवर रोष व्यक्त केला. “एमआयडीसीने कोट्यवधी रुपये हडप केले असून निकृष्ट कामांमुळे समस्या वाढल्या आहेत,” असा गंभीर आरोप आमदार बाबाजी काळे यांनी करत अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

खासदार अमोल कोल्हे यांनी चाकणला श्वास घेण्यासाठी ‘कॉम्प्रीहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन’ तयार करण्याची मागणी केली. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पीएमआरडीएकडून २५० कोटींच्या रस्त्यांची कामे प्रस्तावित असून, नाशिक फाटा ते राजगुरुनगरदरम्यान उन्नत मार्गासाठी (Elevated Corridor) निविदा मागवल्याची माहिती महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी लेखी पत्राद्वारे आंदोलकांना दिली. मात्र, आंदोलकांनी आश्वासनांवर समाधान न मानता ‘चुकीच्या पद्धतीने उभारलेले पूल पाडा, आम्ही मशिनरी देतो’ असा थेट उपाय सुचवून प्रशासनाला कामांची गती वाढवण्यास भाग पाडले.

न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे

error: Content is protected !!
Exit mobile version