गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे चांदणी चौक पूल १ आणि २ ऑक्टोबरदरम्यानच्या मध्यरात्री पडणार, सर्व यंत्रणांनी समन्वयाने...

चांदणी चौक पूल १ आणि २ ऑक्टोबरदरम्यानच्या मध्यरात्री पडणार, सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

पुणे, २८ सप्टेंबर २०२२ : मुंबई- बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील पुणे शहरातील चांदणी चौक येथील पूल येत्या १ व २ ऑक्टोबरदरम्यानच्या (शनिवार-रविवार) मध्यरात्री नियंत्रित स्फोट घडवून पाडण्यात येणार आहे. यामुळे १ ऑक्टोबर रात्री ११ वा. ते २ ऑक्टोबर सकाळी ८ वाजेपर्यंत या महामार्गावरील वाहतूक पूर्णत: बंद ठेवली जाणार आहे. याबाबतचा निर्णय जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

पुण्यातील चांदणी चौक पूल पाडण्यासाठी आढावा बैठक जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक संजीव कदम, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे आदी उपस्थित होते.

चांदणी चौकात होणारी वाहतुकीची समस्या सोडवण्या साठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्यावतीने चांदणी चौक येथे एकात्मिक संरचना पूल प्रकल्पाचे काम करण्यात येणार आहे. त्या अगोदर या ठिकाणी असलेला येथील जूना पूल पाडण्यात येणार आहे. यानंतर महामार्ग सहापदरी करण्यात येणार आहे.

काही दिवसापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी येथे प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली होती. त्याचबरोबर वाहतुकीवर तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याप्रमाणे मागील तीन आठवड्यांपासून पूलासाठीच्या भूमीसंपादनाचे काम पूर्ण करणे, सेवा वाहिन्यांचे स्थलांतरण करणे व इतर कामे युद्धपातळीवर करण्यात येत आहेत. आता हा पूल पाडण्याची सर्व तयारी पूर्ण होत आली असून त्यासाठी आढावा बैठक डॉ. देशमुख यांच्या अध्यक्षते खाली घेण्यात आली.

बैठकीत मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, पुणे शहर पोलीस, पिंपरी-चिंचवड पोलीस तसेच पुणे ग्रामीण पोलीस यांच्याद्वारे समन्वयाने वाहतुकीचे नियमन करण्यात येणार असून आवश्यक तो पोलीस बंदोबस्त पूल पडण्यासाठी देण्यात यावा. वाहतूक बंद असताना मुंबईकडून येणारी जड वाहने उर्से नाका येथे थांबवण्यात येणार असून साताऱ्याकडून मुंबईकडे जाणारी वाहने खेड शिवापूर नाका येथे थांबवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर हलक्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग व वाहतुकीचे नियमन शहर तसेच ग्रामीण पोलीस दलांनी समन्वयाने करावे असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडून देण्यात आले आहेत.

या मार्गावरील दिवसा रहदारीचे प्रमाण पाहता लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून हा पूल रात्री पाडण्याचे निश्चित करण्यात आले आहे. रात्री ११ वा. वाहतूक बंद केल्यावर पहाटे २ च्या दरम्यान स्फोटकांद्वारे ब्लास्ट करण्यात येईल. ब्लास्ट करण्यासाठी सुमारे दीड मीटरची १ हजार ३०० होल घेण्यात आली असून त्यामध्ये सुमारे ६०० कि. ग्रा. स्फोटकांचा वापर केला जाणार आहे. स्फोटकांसाठी पोलीस विभागासह सर्व परवानग्या घेण्यात आल्या आहेत. पुलाचा २०० मीटर परीघातील परिसर ब्लास्टपूर्वी पूर्णत: रिकामा केला जाणार आहे.

पूल पडतेवेळी सुरक्षा तपासणी करण्यासाठी त्याचबरोबर रात्री कामावर देखरेख ठेवण्यासाठी संपूर्ण पूल दिव्यांच्या सहाय्याने प्रकाशित करण्यात येणार आहे. राडारोडा काढण्यासाठी ४ डोझर्स, ८ पोक्लेन, ३९ टिपर तसेच सुमारे १०० कर्मचारी लावण्यात येणार आहेत ब्लास्ट केल्या नंतर अर्ध्या तासाने तेथील परिस्थिती नियंत्रणात आल्यावर सुरक्षिततेची खात्री करुन राडारोडा काढण्यास सुरूवात होईल. सकाळी ८ वाजेपर्यंत संपूर्ण राडारोडा काढून हा मार्ग वाहतूकीसाठी सुरू केला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

या आढावा बैठकीसाठी महामार्ग पोलीसच्या पोलीस अधीक्षक लता फड, एडीफीस इंजिनिअरींग मुंबईचे उत्कर्ष मेहता यांच्यासह पोलीस विभाग, परिवहन विभाग आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी अनिल खळदकर

error: Content is protected !!
Exit mobile version