गोल पोस्ट उत्तर भारतीय समुदाय पिंपरी-चिंचवडमध्ये छठपूजेचा उत्साह इंद्रायणी-पवना घाटांवर महासोहळा!

पिंपरी-चिंचवडमध्ये छठपूजेचा उत्साह इंद्रायणी-पवना घाटांवर महासोहळा!

उत्तर भारतीयांचे प्रमुख आणि पवित्र मानले जाणारे छठपर्व पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरे होत आहे. आज सोमवार (दि. २७) आणि उद्या मंगळवारी इंद्रायणी नदीच्या मोशी घाटावर आणि पवना नदीच्या चिंचवड घाटावर हा महापर्व सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

मोशी व चिंचवड घाटांवर भक्तांची मांदियाळी!

कुटुंबाच्या आणि विश्वाच्या कल्याणासाठी तसेच चांगल्या पीकपाण्यासाठी सूर्यदेवता आणि छठमातेची उपासना करण्यासाठी हे व्रत केले जाते. उत्तर भारतीय महिला, पुरुष आणि बाल-गोपाल मोठ्या संख्येने या पूजेत सहभागी होत आहेत. मोशी येथील इंद्रायणी नदी घाटावर भोसरी, चाकण, चिखली, कोयाळीसह अनेक भागांतून भाविक उपस्थित राहणार आहेत.

त्याचप्रमाणे, पवना नदीवरील चिंचवड, पिंपळे सौदागर, नेहरूनगर अशा विविध परिसरातील भाविक चिंचवड घाटावर सहभागी होतील. पारंपरिक पूजा, भजन-कीर्तन, आणि छठ लोकगीते सादर करून महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे.

मोशीमध्ये भव्य गंगा आरती आणि अयोध्या महंतांची उपस्थिती!

मोशी येथील इंद्रायणी नदीच्या घाटावर श्री विश्व श्रीराम सेनेच्या वतीने छटपूजेचे आयोजन करण्यात आले आहे. श्री सूर्यषष्ठी महोत्सवाचा मुख्य कार्यक्रम आज सायंकाळी पाच वाजता सुरू होईल.

या वेळी अयोध्या येथील सिद्धपीठ हनुमान गढीचे महंत राजूदास महाराज यांची विशेष उपस्थिती असणार आहे. सायं. ६:०४ वा. सूर्यास्ताच्या वेळी हजारो भाविकांच्या साक्षीने वाराणसी येथून आलेल्या प्रतिनिधींच्या हस्ते भव्य गंगा आरती केली जाईल.

महोत्सवाचा समारोप मंगळवारी सकाळी ६:३३ वा. सूर्योदयावेळी सूर्याला अर्घ्य देऊन होईल. चिंचवडमध्ये हनुमान मित्र मंडळाच्या वतीने पवनानदी घाटावर कार्यक्रमाचे संयोजन करण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये या दोन्ही नद्यांच्या तीरावर दोन दिवसांचा हा धार्मिक, सांस्कृतिक आणि श्रद्धापूर्ण सोहळा उत्साहाने पार पडत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: सोनाली तांबे

error: Content is protected !!
Exit mobile version