गोल पोस्ट इतर राजकारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मध्यरात्री अचानक दिल्लीत दाखल, मोदी आणि शाह यांची आज...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मध्यरात्री अचानक दिल्लीत दाखल, मोदी आणि शाह यांची आज घेणार भेट

नवी दिल्ली, २२ जुलै २०२३ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रात्री अचानक दिल्लीत दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीत एकटेच आले आहेत. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार नाहीत. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री दिल्लीत येण्याचे कारण स्पष्ट झालेले नाही. मात्र, मुख्यमंत्री दिल्लीत रात्रीच्यावेळी अचानक आल्याने मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रात्री दीड वाजण्याच्या सुमारास दिल्लीत आले. आपल्या कुटुंबासह मुख्यमंत्री दिल्लीत आले आहेत.आज दिवसभरात ते पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांची भेट घेणार आहेत. या भेटीत शिंदे काय चर्चा करतात आणि काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिंदे आज दिल्लीत भाजपच्या इतर नेत्यांचीही भेट घेणार असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, या भेटीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा करणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, देवेंद्र फडणवीस यांना वगळून ही चर्चा होऊच शकत नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. शाह यांच्या भेटीत विस्ताराचा विषय निघू शकतो, मात्र, शिंदे यांच्या भेटीचे मुख्य कारण वेगळेच असल्याचे सांगितले जात आहे. शिंदे यांना बदलून राज्याची सूत्रे अजित पवार यांच्या हाती दिली जाण्याची चर्चा आहे. त्यामुळे शिंदे लॉबिंग करण्यासाठी आले की काय? अशा चर्चा आहेत.

अजित पवार हे राज्यातील सत्तेत सहभागी झाले आहेत. त्याच्या गटाला अर्थ खात्यासह इतर महत्त्वाची खातीही देण्यात आली आहे. शिंदे गटाच्या वाट्याला आलेली खातीही अजित पवार यांच्या गटाला देण्यात आल्याने शिंदे गटात नाराजी आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची डोकेदुखी वाढली आहे. त्याबाबतही शिंदे या भेटीत चर्चा करणार असल्याचे सांगितले जात आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

error: Content is protected !!
Exit mobile version