गोल पोस्ट इतर राजकारण शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाचा गोंधळ कायम, शासनाची पुन्हा नवी तारीख

शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाचा गोंधळ कायम, शासनाची पुन्हा नवी तारीख

नाशिक, ११ जुलै २०२३ : नाशिक शहरांमध्ये आयोजित ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाचा गोंधळ अदयापही कायम आहे. शासनाने कार्यक्रमासाठी नव्याने तारीख कळविली आहे. शासनाच्या नव्या मुहूर्तानुसार एक दिवस उशिरा म्हणजेच शनिवारी दिनांक १५ जुलै रोजी हा कार्यक्रम होणार आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी शासनाकडून राज्यभरात शासन आपल्या दारी कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

त्या अंतर्गत नाशिकमध्ये शुक्रवारी या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाकडुन गंगापूर रोडवरील डोंगरे वसतिगृहाच्या मैदानावर मंडप उभारणीसह अन्य कामे हाती घेतली गेली. मात्र राज्यस्तरावरुन सोमवारी नव्याने फतवा काढण्यात आला आहे. यानुसार हा कार्यक्रम नियोजित तारखेच्या एक दिवस उशिरा घेण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आल्यामुळे प्रशासन पुन्हा एकदा बुचकळ्यात पडले आहे.

राज्यातील सत्ता नाट्यामुळे शहरात ८ जुलै रोजी होणारा कार्यक्रम १५ जुलैपर्यंत पुढे ढकलण्यात आला होता. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या सोयीच्या वेळेनुसार १४ जुलै रोजी कार्यक्रम घेण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु शासनाने आता पुन्हा एकदा कार्यक्रमासाठी १५ जुलै ही तारीख निश्चित केली आहे. त्यामुळे आता शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या आयोजनावरच प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

error: Content is protected !!
Exit mobile version