गोल पोस्ट इतर राजकारण काँग्रेसच्या नेत्या संगिता तिवारी यांचा रुपाली चाकणकर यांच्या पदावर आक्षेप, महिला आयोगाचे...

काँग्रेसच्या नेत्या संगिता तिवारी यांचा रुपाली चाकणकर यांच्या पदावर आक्षेप, महिला आयोगाचे अध्यक्षपद धोक्यात?

पुणे, १३ जुलै २०२३ : गेल्या काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड करत ४० आमदारांसह आपला गट घेऊन ते बाहेर पडले. यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबरच, पक्ष चिन्हावरही दावा केला. त्यानंतर त्यांनी पक्षाची नवीन कार्यकारणी सुद्धा जाहीर केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी सुनील तटकरे यांची नियुक्ती करण्यात आली तर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष असलेल्या रुपाली चाकणकर यांची, राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

गेल्या दोन दिवसांपासून रुपाली चाकणकर आणि शिवसेना आमदार भरत गोगावले यांच्यात जुगलबंदी रंगली आहे. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरुन भरत गोगावले यांनी आदिती तटकरे यांच्यावर टीका केली होती. मी आदिती तटकरे यांच्यापेक्षा चांगले काम करू शकतो. महिला आणि पुरुष यांच्यात काही फरक असतो ना, असे विधान भरत गोगावले यांनी केले होते. त्यावरुन रुपाली चाकणकर यांनी गोगावले यांच्यावर टीका केली होती.

राज्यातील राजकीय घडामोडी नंतर रुपाली चाकणकर अजित पवार यांच्या गटासोबत आल्या आहेत. त्यानंतर त्यांचे पद धोक्यात आले आहे. त्यांच्या पदावर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. काँग्रेसच्या महिला नेत्या संगिता तिवारी यांनी रुपाली चाकणकर यांच्या पदावर आक्षेप घेतला आहे. संविधानिक पदावर असताना एखादी व्यक्ती राजकीय पद भूषवित असेल तर ते असंविधनिक आहे, असा दावा संगिता तिवारी यांनी केला आहे.

रुपाली चाकणकर या महिला आयोगाच्या अध्यक्षा आहेत. अजित पवार यांनी त्यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे संगिता तिवारी यांनी तक्रार केली आहे. रुपाली चाकणकर यांच्याबाबत संविधान आणि कायद्यानुसार ताबडतोब निर्णय द्यावा, अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे.

काँग्रेस नेत्या संगिता तिवारी यांनी उच्च न्यायालयास रुपाली चाकणकर यांच्यासंदर्भात पत्र लिहिले आहे. त्यात म्हटले आहे की, एखादी संविधनिक पदावरील व्यक्ती राजकीय पक्षाचे पद भूषवू शकत नाही. हा प्रकार असंविधनिक आहे. यामुळे चुकीचा पायंडा पाडला जाईल. मग उद्या राज्यपाल या पदावर असणारी व्यक्तीही एखादया राजकीय पक्षाचा अध्यक्ष होऊ शकेल. हा प्रकार कायदा आणि संविधानाला धरून नाही.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

error: Content is protected !!
Exit mobile version