गोल पोस्ट गुन्हा पुण्यातील सायबर फसवणूक प्रकरण – उच्चशिक्षित तरुणावर अटक

पुण्यातील सायबर फसवणूक प्रकरण – उच्चशिक्षित तरुणावर अटक

पुण्यातील कोथरुड परिसरातील एका नामांकित खासगी विद्यापीठाची २.५ कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या ३४ वर्षीय तरुणाला पुणे पोलिसांच्या सायबर ब्रांचने हैदराबादमध्ये सापळा रचून अटक केली आहे. आरोपी, सितैया किलारु (रा. याप्रल, हैदराबाद), उच्चशिक्षित असून परदेशातून पदव्युत्तर आणि पीएच.डी. पूर्ण केलेला आहे. याशिवाय, तो केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत दोन वेळा मुलाखतीच्या टप्प्यापर्यंत पोहोचला होता. न्यायालयाने त्याला २८ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

आरोपीने ‘आयआयटी’ मुंबईतील प्राध्यापक असल्याचे भासवून पुण्यातील एका प्राध्यापकाचा विश्वास संपादन केला आणि सरकारच्या कृत्रिम बुद्धिमत्ता व ड्रोन प्रकल्पासाठी करार करण्याचे आश्वासन देऊन विद्यापीठाकडून २ कोटी ४६ लाख रुपये मिळवले. मात्र, करारासाठी उपस्थित न राहिल्यामुळे फसवणूक उघडकीस आली आणि विद्यापीठाने पोलिसांकडे तक्रार केली.

सायबर पोलिसांनी तांत्रिक तपास करून आरोपीचं खरे नाव समोर आणलं. तो विजयवाडा येथील असून, २०१० मध्ये ईएनटीसी अभियांत्रिकी पूर्ण करून पुढील शिक्षणासाठी ब्रिटनमध्ये गेला होता. तेथे स्टॅफोर्डशायर व बर्मिंगहॅम विद्यापीठांतून पदव्युत्तर व पीएच.डी. पूर्ण केल्यानंतर हैदराबादमधील दोन विद्यापीठांत नोकरी केली. तसेच, २०१९ व २०२० मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली होती.

सायबर पोलिसांचे पथक १८ सप्टेंबरला हैदराबाद रवाना झाले. चार दिवसांच्या शोध मोहिमेनंतर आरोपीला जेरबंद करण्यात आले. हैदराबाद न्यायालयाकडून ट्रान्झिट रिमांड मिळवून आरोपीला पुण्यात आणण्यात आले. वरिष्ठ निरीक्षक स्वप्नाली शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कामगिरी यशस्वी केली.

आरोपीकडून पोलिसांनी ४९ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यात दहा बँकांचे एटीएम कार्ड, १३ पासबुक, १५ चेकबुक, सिमकार्ड, कम्प्युटर, मोबाइल, टॅब, दागदागिने, सोने खरेदी पावत्या तसेच ४८ लाख रुपये किमतीच्या दोन कारांचा समावेश आहे. आरोपीवर हैदराबादमध्ये यापूर्वीही फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. त्याने ऑनलाइन जुगारात सुमारे सव्वाकोटी रुपये गमावल्याचा दावा केला आहे, अशी माहिती वरिष्ठ निरीक्षक स्वप्नाली शिंदे यांनी दिली.

न्यूज अनकट प्रतिनिधी ध्रुव पाटील

error: Content is protected !!
Exit mobile version