ज्या कंपनीने नोकरी दिली, त्याच कंपनीच्या पाठीत खंजीर खुपसून ‘डिजिटल’ दगाफटका केल्याचा एक धक्कादायक प्रकार दापोडी परिसरात उघडकीस आला आहे. कंपनीत सर्व्हिस इंजिनीअर म्हणून काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांनी आपल्या आर्थिक फायद्यासाठी थेट कंपनीचे गुपित सॉफ्टवेअर चोरले आणि नातेवाइकांच्या नावे नवी कंपनी स्थापन करण्याचा मास्टरप्लॅन आखला!
दापोडी येथील या घटनेने उद्योगजगतात खळबळ माजवली आहे. जयराम निवृत्ती वाणी (भोसरी) आणि हरप्रीत सिंग (हडपसर) या दोन कर्मचाऱ्यांवर दापोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २१ जानेवारी २०२४ ते १४ ऑगस्ट २०२५ या कालावधीत ही चोरी आणि फसवणूक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या कर्मचाऱ्यांनी कंपनीने दिलेला लॅपटॉपमधील हार्ड डिस्क काढून त्यातील सॉफ्टवेअरची चोरी केली. केवळ चोरीवर न थांबता, त्यांनी स्वतःच्या नातेवाइकांच्या नावाने नवी कंपनी सुरू केली. इतकेच नाही, तर त्यांनी खोटी माहिती देऊन कंपनीची फसवणूक केली.
मूळ कंपनीचे आर्थिक नुकसान करत त्यांनी अमेरिकन आणि फिर्यादीच्या मालकीच्या कंपनीचा लोगो वापरून बेकायदेशीरपणे मोठे कॉन्ट्रॅक्ट्स मिळवले. कंपनीच्या संचालकांनी याबाबत दापोडी पोलिसांकडे फिर्याद दिली असून, पुढील तपास सुरू आहे. विश्वासघात करून कंपनीला फटका देणाऱ्या या कर्मचाऱ्यांवर आता कायद्याचा बडगा उगारला गेला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे