गोल पोस्ट गुन्हे आणि कारवाई ‘लकबी’ने उघड केली चोरट्याची ‘चाल’ दिघीतील तीन घरफोड्यांचा काही तासांत छडा!

‘लकबी’ने उघड केली चोरट्याची ‘चाल’ दिघीतील तीन घरफोड्यांचा काही तासांत छडा!

दिघी परिसरात झालेल्या सलग तीन घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात दिघी पोलिसांना काही तासांतच यश आले आहे. केवळ संशयिताच्या चालण्याच्या लकबीवरून त्याचा माग काढत पोलिसांनी तब्बल साडेचार लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

रोहित रायमशी मत्तू (वय ३२, रा. भारतमातानगर, दिघी) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे, जो मूळचा जम्मू काश्मीरचा आहे. गजानन महाराज नगर येथे १५ ऑक्टोबर रोजी परमेश्वर गिराम यांच्या घरात दिवसाढवळ्या घरफोडी झाली होती, ज्यात १४ तोळ्यांहून अधिक सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरीला गेली होती. याशिवाय परिसरातील संतोष खोत आणि प्रतिभा पाटील यांच्या घरातही चोरी झाल्याचे निष्पन्न झाले.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी तातडीने घटनास्थळाची पाहणी केली. पोलिसांनी तिन्ही ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, तिन्ही घरफोड्यांमध्ये एकच संशयित असल्याचे दिसून आले. पोलिसांच्या पथकाने या संशयिताच्या चालण्याच्या लकबीवरून त्याचा माग काढला आणि सापळा रचून त्याला काही तासांतच जेरबंद केले.

पोलिसांनी संशयिताकडून १४५ ग्रॅम सोन्याचे दागिने, सहा मोबाइल फोन, रोख ३२ हजार रुपये, घड्याळे आणि हेडफोनसह गुन्ह्यात वापरलेले कपडे असा एकूण साडेचार लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
पोलिस उपायुक्त बापू बांगर, सहायक आयुक्त सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक प्रमोद वाघ, निरीक्षक विनायक पाटील, सहायक निरीक्षक श्रीनिवास कामूनी आणि योगेश नागरगोजे यांच्या पथकाने केलेल्या या कौतुकास्पद कामगिरीमुळे दिघी पोलिसांनी आपली ‘खाकी’ची तत्परता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: सोनाली तांबे

error: Content is protected !!
Exit mobile version