गोल पोस्ट गुन्हा पुण्यात दुधानी टोळीने दहशत; हाताने मारहाण आणि कोयत्याने हल्ला

पुण्यात दुधानी टोळीने दहशत; हाताने मारहाण आणि कोयत्याने हल्ला

पुण्यातील स्वारगेट परिसरात ‘दुधानी’ टोळीने पुन्हा दहशत निर्माण केली आहे. डायस प्लॉट भागात एका व्यक्तीवर कोयत्याने हल्ला करण्यात आला, ज्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भय निर्माण झाले. याआधी कोथरूड परिसरात घायवळ टोळीच्या हल्ल्यामुळे सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागला होता.

तक्रारदार आबा सरोदे (वय ३९) डायस प्लॉटमधील कॅनॉलजवळ उभे असताना आरोपींनी त्यांच्यावर हल्ला केला. सुरुवातीला त्यांना हाताने मारहाण करण्यात आली, त्यानंतर टोळक्याने कोयत्याने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. हल्ल्यानंतर आरोपींनी हवेत हत्यारे फिरवून परिसरात दहशत पसरवली, ज्यामुळे नागरिक भयभीत झाले.

घटनेनंतर आरोपी पसार झाले. भक्तिसिंग दुधानी, शक्तिसिंग दुधानी, गोविंदसिंग टाक, आकाशसिंग दुधानी यांसह सात जणांविरोधात खुनाचा प्रयत्न, आर्म्स अॅक्टसह गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

गोविंदसिंग टाकवर आधी ‘मकोका’ अंतर्गत कारवाई झाली असून तो एप्रिल २०२५ मध्ये कारागृहातून मुक्त झाला होता. दुधानी टोळीतील इतर सदस्यांवर देखील खुनाचा प्रयत्न आणि शस्त्र बाळगण्याचे गंभीर गुन्हे नोंदले आहेत. पोलिसांच्या अंदाजानुसार हा हल्ला जुन्या वादातून घडल्याचा समज आहे.

घटनेनंतर पोलिसांनी परिसरात छापेमारी केली असून तपास सुरू आहे. आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक निकिता पवार करत आहेत. ‘मकोका’सारखे कठोर कायदे असूनही, कारागृहातून बाहेर पडल्यावर आरोपी पुन्हा गुन्हेगारीकडे वळत आहेत. तपासात असेही समोर आले आहे की, टोळीत गंभीर गुन्हे करण्यासाठी अल्पवयीन मुलांना सामील केले जात आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी ध्रुव पाटील

error: Content is protected !!
Exit mobile version