पुणे | नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्न मिळावे यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) ‘सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र’ अभियानांतर्गत पुणे विभागात मोठी कारवाई केली आहे. २३ ते २८ जुलै २०२६ या कालावधीत पुणे, कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यांतील १३ ठिकाणी धाडी टाकून तब्बल ₹५० लाख ६५ हजार ३७२ किमतीचा संशयित अन्नसाठा जप्त करण्यात आला.
या कारवाईत गूळ, साखर, दूध, दही, पनीर, चक्का, फरसाण, काजू, बदाम, मनुके, सोनपापडी, कँडी, चॉकलेट वेफर, बिस्किटे, टोस्ट आणि मलाई कुल्फी यांसारख्या विविध अन्नपदार्थांचा समावेश आहे. अनेक ठिकाणी भेसळीचा संशय, लेबलमधील त्रुटी, मिथ्याछाप, स्वच्छतेचा अभाव आणि परवान्याशिवाय व्यवसाय सुरू असल्याचे आढळून आले.
पुण्यात सलग धाडसत्र
पुणे जिल्ह्यातील दौंड येथील Thinvincible Natural Foods Pvt. Ltd. येथे गूळ आणि गूळ ट्रे असा ₹१.१४ लाखांचा साठा जप्त करण्यात आला. त्यानंतर गणेश पेठ, भवानी पेठ आणि नाना पेठ परिसरात मिठाई, इमली जेली, कँडी, सोनपापडी, चिक्की, फरसाण, मसाले, काजू, बदाम आणि इतर खाद्यपदार्थांवर कारवाई करण्यात आली.या मोहिमेतील सर्वात मोठी कारवाई भवानी पेठेतील श्री माणिक सोहनलाल परमार यांच्या गोदामावर करण्यात आली.
येथे सेंटर फिल्ड कँडी आणि चॉकलेट वेफर रोल असा ₹३६.३९ लाखांचा साठा भेसळीच्या संशयावरून व लेबलमधील त्रुटींमुळे जप्त करण्यात आला.
कोल्हापूरमध्ये विनापरवाना व्यवसायावर कारवाई
कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी येथे गूळ तयार करणाऱ्या एका पेढीवर छापा टाकून गूळ आणि व्हाईट क्रिस्टल शुगर असा ₹१.७९ लाखांचा साठा जप्त करण्यात आला. संबंधित व्यावसायिकाकडे आवश्यक परवाना नसल्याचे आढळल्याने त्याला व्यवसाय बंद करण्याचे आदेश देण्यात आले.
कराडमध्ये दूध भेसळीचा संशय
सातारा जिल्ह्यातील कराड येथे गोपनीय माहितीच्या आधारे टाकलेल्या धाडीत म्हशीच्या दुधात पाम तेल मिसळून भेसळ केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. याप्रकरणी दोन जणांविरोधात कराड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. जप्त करण्यात आलेले दूध नाशवंत असल्याने ते जागेवरच नष्ट करण्यात आले.
सांगली आणि जुन्नरमध्येही कारवाई
सांगली जिल्ह्यात घी टोस्ट, दही, पनीर, चक्का, बिस्किटे आणि कच्चे गायीचे दूध यावर कारवाई करण्यात आली. दूध भेसळीच्या संशयावरून नष्ट करण्यात आले, तर इतर अन्नपदार्थांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.दरम्यान, जुन्नर येथील Sanchita Foods येथे तयार होणाऱ्या मलाई कुल्फीच्या उत्पादनात स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले. मानवी आरोग्याचा संभाव्य धोका लक्षात घेऊन संबंधित कुल्फी जागेवरच नष्ट करण्यात आली.
कठोर कारवाईचा इशारा
अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, विनापरवाना व्यवसाय, भेसळयुक्त किंवा निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थ तयार करणे आणि अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध पुढेही कठोर कारवाई सुरू राहील. प्रयोगशाळेच्या अहवालानंतर संबंधितांवर अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे
न्यूज अनकट प्रतिनिधी – दिनेश वढणे
