छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यातील हदियाबाद-नारवाडी परिसरात रस्त्याच्या कडेला एका युवकाचा मृतदेह आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. स्थानिक नागरिकांना हा मृतदेह रस्त्याच्या कडेला आढळल्याने त्यांनी लगेच याची माहिती गंगापूर पोलिस ठाण्याला दिली.
पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढला आणि पंचनामा करून मृतदेह उपजिल्हा रुग्णालय, गंगापूर येथे पाठवला. मृत युवकाची ओळख गणेश रघुनाथ टेमकर (वय ३०, रा. भालगाव) अशी आहे. प्राथमिक तपासात मृतदेहाजवळ कोणतेही संघर्षाचे ठसे किंवा वाहन अपघाताचे स्पष्ट चिन्हे आढळली नाहीत. त्यामुळे घातपात की अपघात याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलीस याचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण असून नागरिकांमध्ये अनेक चर्चा रंगल्या आहेत. गंगापूर पोलिसांनी शवविच्छेदनाचा अहवाल येईपर्यंत काहीही सांगणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. पुढील तपास सुरू आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: संजय आहेर
