घर बांधण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी ही सर्वात मोठी आनंदवार्ता आहे! सिमेंटच्या किमतीत कपात झाल्यानंतर आता स्टीलचे दरही मोठ्या प्रमाणावर कोसळले आहेत. निर्यात घटल्याने आणि परदेशातून होणारी आयात वाढल्यामुळे देशातील स्टीलचे भाव २०१९ नंतर प्रथमच पाच वर्षांच्या नीचांकावर आले आहेत. या ऐतिहासिक घसरणीमुळे सामान्य माणसासाठी स्वतःचं हक्काचं घर बांधण्याचा मार्ग आता अत्यंत सुकर झाला आहे.
देशांतर्गत औद्योगिक आणि बांधकाम क्षेत्रातील मागणी मंदावल्यामुळे हॉट-रोल्ड कॉइल, टीएमटी बार आणि स्ट्रक्चरल स्टीलचे दर मोठ्या प्रमाणात खाली आले आहेत. यासोबतच, केंद्र सरकारने सिमेंटवरील जीएसटी २८% वरून १८% पर्यंत कमी केल्याने सिमेंटची पिशवी २५ ते ३० रुपयांनी स्वस्त झाली आहे. सिमेंट आणि स्टील या दोन्ही महत्त्वाच्या बांधकाम साहित्याच्या किमती एकदम कमी झाल्यामुळे बांधकाम खर्चात थेट मोठी बचत होणार आहे, ज्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
किंमत घटण्यामागील प्रमुख कारणे
- चीन, कोरिया, जपानकडून स्टीलची आयात वाढली.
- जागतिक बाजारात स्टीलच्या मागणीत घट.
- स्थानिक बांधकाम व वाहन उद्योगात असलेली मंदी.
- स्थानिक उत्पादकांकडे स्टीलचा साठा मोठ्या प्रमाणात वाढला.
वाल्हेकरवाडी येथील रहिवासी विजय मोरे यांच्या मते, “सिमेंट-स्टीलच्या वाढलेल्या भावांमुळे बरेच लोक घराचे स्वप्न पुढे ढकलत होते. आता दोन्ही वस्तू स्वस्त झाल्याने ते स्वप्न पुन्हा उजळत आहे.” तर संजय नलावडे यांनी “कच्च्या मालाच्या दरात घट झाल्याने बांधकाम क्षेत्रावरील ताण कमी होऊन सामान्यांसाठी घर बांधणे आता अधिक सोपे झाले आहे” असे मत व्यक्त केले आहे.
सिमेंट आणि स्टील, दोन्ही स्वस्त झाल्याने घरबांधणीच्या खर्चात प्रत्यक्ष आणि महत्त्वपूर्ण लाभ मिळत आहे. त्यामुळे, ज्यांनी घराचे बांधकाम थांबवले होते किंवा पुढे ढकलले होते, त्यांच्यासाठी ही उत्तम वेळ आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: सोनाली तांबे
