काल झालेल्या सामन्यात धमाकेदार खेळीनंतर हार्दिक पांड्या ने सांगितली आपल्या बॅट बद्दल ही गोष्ट…

दुबई, २६ ऑक्टोबर २०२०: इंडियन प्रिमियर लीगमध्ये रविवारी खेळवण्यात आलेल्या राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्यात राजस्थानने शानदार विजय मिळवत स्पर्धेतील आव्हान टिकवून ठेवले आहे.

राजस्थानच्या बेन स्टोक्स-संजू सॅमसन या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी केलेल्या नाबाद १५२ धावांच्या भागीदारीच्या जोरावर राजस्थानने मुंबई इंडियन्सवर ८ विकेट्सने मात केली. या सामन्यात मुंबईने हार्दिक पांड्याच्या तडाखेबंद खेळीच्या २१ चेंडूत ६० धावा जोरावर १९५ धावांचा डोंगर उभा केला होता. परंतु हे आव्हान राजस्थानने पार केले.

या सामन्यात मुंबई पराभूत झाली असली तरी मुंबईचा हार्दिक पांड्या या सामन्याचा हिरो ठरला. पांड्याने या सामन्यात राजस्थानच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. पांड्याने २१ चेंडूत सात षटकार आणि दोन चौकारांसह नाबाद ६० धावांची खेळी केली. त्याने दोन वेळा एकाच षटकात २७-२७ धावा फटकावल्या. त्याने सुरुवातीला अंकित राजपूत आणि नंतर कार्तिक त्यागीच्या गोलंदाजीवर हल्लाबोल केला.

आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील हार्दिक पांड्याचे हे पहिलेच अर्धशतक होते. यापूर्वी नाबाद ३० ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती. पांड्या मुंबईच्या संघासाठी फिनिशरची भूमिका बजावतोय. पाठीला झालेल्या दुखापतीपासून तो गोलंदाजीपासून दूर आहे.

मुंबईची फलंदाजी आटोपल्यावर हार्दिकने कमेंटेटर्सशी बातचित केली. यावेळी त्याने सांगितले की, तीन वर्ष जुनी बॅट वापरत त्याने आजची खेळी केली. त्यामुळेच तो फलंदाजी करत असताना सतत बॅट पाहात होता. हार्दिक म्हणाला की, मी खूप दिवसांपासून अशा संधीची वाट पाहात होतो. मी माझी जुनी आणि आवडती बॅट वापरत होतो. आज पुन्हा एकदा याच बॅटच्या सहाय्याने मी मोठी खेळी केली.

मुंबईच्या संघाबाबत पांड्या म्हणाला की, आयपीएल सुरु होण्याअगोदरपासून आमचा संघ खूप मेहनत घेतोय. संघ चांगल्या स्थितीत आहे. मी खूप दिवसांपासून अशा खेळीची वाट पाहात होतो. अशा खेळीमुळे अजून प्रोत्साहन मिळतं. मला असे मोठे षटकार ठोकायला आवडतं.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अंकुश ढावरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा