गोल पोस्ट आरोग्य आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची बाणेरला भेट, कोरोना जनजागृतीबाबत केलं मार्गदर्शन

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची बाणेरला भेट, कोरोना जनजागृतीबाबत केलं मार्गदर्शन

पुणे, २२ सप्टेंबर २०२०: काल पुण्यातील बाणेर इथं राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी राज्य शासनामार्फत राबवण्यात येणाऱ्या माझे कुटुंब माझी जबाबदरी कार्यक्रमाअंतर्गत काम करणाऱ्या सर्वेक्षण पथकासोबत संवाद साधून त्यांचा उत्साह वाढवला. यादरम्यान त्यांना घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणे, रुग्णाचे निदान लवकर होण्यासाठी जनतेचा सहभाग घेणे, काळजी कशी घ्यावी, सकस आहार घेणे, विश्रांती घेणे, योगा करणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे आदींबद्दल जनजागृती करण्याच्या सूचना दिल्या.

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहिम महत्त्वपूर्ण असल्याचं सांगतानाच ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ उपक्रमाला सर्वांचा प्रतिसाद महत्वाचा ठरणार असल्याचं प्रतिपादन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल बाणेर मध्ये केलं. बाणेर येथील युतिका सोसायटीमध्ये ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ कार्यक्रमात आरोग्यमंत्री राजेश टोपे बोलत होते.

आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेमुळं कोरोनाचे पूर्वनिदान होण्यास मदत होणार आहे. पूर्वनिदान झालं तर मृत्यूचं प्रमाणही कमी होणार आहे. प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचणं या मोहिमेमुळं शक्य होणार आहे. नागरिकांनी आपल्या घरी तपासणी व माहिती, सूचना आदींसाठी येणा-या स्वयंसेवकांना संपूर्ण सहकार्य करावे. असं आवाहनही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं.

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी स्वंयशिस्त महत्त्वाची असल्याचे सांगून आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, स्वंयशिस्त पाळली तर आपण कोरोनाला रोखू शकतो, कोरोनाशी लढण्यापेक्षा कोरोना होवूच नये यासाठी प्रत्येकाने दक्षता घेण्याची गरज आहे. रोगप्रतिकारशक्ती चांगली ठेवण्यासाठी प्रत्येकाने योग्य ती काळजी घ्यावी. प्रत्येकाने स्वत: सोबत इतरांच्याही आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. पुणे महानगरातील युतिकासारख्या सोसायट्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पुढाकार घेतला ही कौतुकास्पद बाब असल्याचं त्यांनी सांगितलं.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार, आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापुरकर, डॉ. सुभाष साळुंखे, अतिरिक्त आयुक्त डॉ कुणाल खेमनार, उपायुक्त नितीन उदास, सहाय्यक आयुक्त जयदीप पवार, आरोग्य अधिकारी डॉ वैशाली जाधव, क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी डॉ गणेश डमाळे, नगरसेविका ज्योतीताई कळमकर, बाबुराव चांदेरे, अमोल बालवडकर तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

error: Content is protected !!
Exit mobile version