गोल पोस्ट महाराष्ट्र हिंगोली भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण यांच्यावर गोळीबार, हल्लेखोर पसार

हिंगोली भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण यांच्यावर गोळीबार, हल्लेखोर पसार

हिंगोली, १ ऑगस्ट २०२३: हिंगोलीतील भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण यांच्यावर जिल्हा परिषद आवारात आज दुपारी ३ च्या सुमारास गोळीबार झाला आहे. यावेळी दोन अज्ञात जणांनी त्यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या. यातील एक गोळी त्यांच्या पाठीत लागल्याने त्यांना तत्काळ उपचारासाठी खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सीसीटीव्ही फुटेज चेक करत हल्लेखोरांचा तपास सुरू करण्यात आला आहे. रुग्णालयासमोर चव्हाण समर्थकांनी गर्दी केली असुन घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांनी धाव घेतली आहे. हिंगोली येथील जिल्हा परिषदेत कामानिमित्त पप्पू चव्हाण आले होते. त्यावेळी तेथे असलेल्या दोन हल्लेखोरांनी त्यांच्या दिशेने गोळीबार केला. ते बचावासाठी खाली वाकले. त्यामुळे दोन गोळ्या त्यांच्या पाठीत घुसल्या, असे प्रत्यक्षदर्शींनीने सांगितले आहे. तर दोन गोळ्या प्रांगणात जमिनीवर पडल्याचे आढळुन आले आहे.

या घटनेनंतर जिल्हा परिषदेच्या परिसरात बघ्यांची गर्दी झाली होती. चव्हाण यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना नांदेडच्या खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. पोलीस तपास सुरु असुन लवकरच हल्लेखोरांना पकडण्यात येईल असे, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांनी सांगितले.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

error: Content is protected !!
Exit mobile version