कोल्हापूर, २५ फेब्रुवारी २०२३ : माझ्या फंद्यात पडू नका, अन्यथा पुण्यात येऊन बारा वाजवीन, असा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना दिला. पवार यांना बारामतीशिवाय काय राजकारण कळते, असा सवालही त्यांनी केला. आज कोल्हापूर दौऱ्यावर आले असता ते माध्यमांशी बोलत होते.
अजित पवार यांनी प्रचारसभेत बोलताना नारायण राणे यांच्यावर टीका केली होती. जे नेते शिवसेना सोडून गेले, त्यांचा पराभव झाला. राणे यांचा तर दोनवेळा पराभव झाला. मुंबईत तर राणे यांना एका महिलेनी पाडले, अशी बोचरी टीका पवार यांनी केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना राणे म्हणाले की, महिला असो की पुरुष तो उमेदवार असतो. त्यामुळे कोणाकडून पराभव झाला, हे महत्त्वाचे नसते.
शिवसेना संपली तशी राष्ट्रवादी काँग्रेसही संपणार का? या प्रश्नावर राणे म्हणाले की, ज्या-त्या पक्षाची विचारसरणी वेगळी असते. त्यानुसार तो पक्ष सत्तेत असताना आपली ध्येयधोरणे राबवीत असतो. ही ध्येयधोरणे जनतेच्या पसंतीला पडली की, त्या पक्षाला पुन्हा जनता सत्तेवर बसवते. त्यामुळे कोणता पक्ष संपणार, हे सांगायला मी काही ज्योतिषी नाही, असे नारायण राणे यांनी यावेळी सांगितले.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : अमोल बारवकर