गोल पोस्ट इतर पोल्ट्री फार्ममध्ये तीन बिबट्यांनी पाडला सुमारे चारशे कोंबड्यांचा फडशा; दीड लाख रुपयांवर...

पोल्ट्री फार्ममध्ये तीन बिबट्यांनी पाडला सुमारे चारशे कोंबड्यांचा फडशा; दीड लाख रुपयांवर नुकसान

अकोले तालुक्यातील मेहेंदुरी येथील घटना

अकोले (अहमदनगर), ८ जानेवारी २०२३ : तालुक्यातील मेहेंदुरी येथील शेतकरी सुधीर दगडू बंगाळ यांच्या पोल्ट्री फार्ममध्ये तीन बिबट्यांनी सुमारे ४०० कोंबड्यांचा फडशा पाडल्याची घटना घडली. अनेक कोंबड्या भयभीत झाल्या, तर काही कोंबड्या दगावण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मेहेंदुरी परिसरात उसाची शेती मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या परिसरात नेहमीच बिबट्यांचा वावर असतो. काही दिवसांपूर्वी अकोले वनविभागाने या परिसरातून एका बिबट्याला जेरबंदही केले होते; तसेच सध्या या परिसरात अनेक बिबटे संचार करीत आहेत.

शुक्रवारी (ता. सहा) रात्री एक वाजेच्या सुमारास सुधीर बंगाळ यांच्या पोल्ट्री फार्ममध्ये एक नव्हे, तर तीन बिबटे घुसले. बिबट्यांनी पोल्ट्री फार्ममध्ये धुमाकूळ घालत शेकडो कोंबड्यांना आपले भक्ष्य बनविले. यामध्ये अनेक कोंबड्यांना जखमी केले. बिबट्यांच्या या हल्ल्यात सुमारे ४०० कोंबड्या दगावल्या आहेत. पोल्ट्री मालक सुधीर बंगाळ यांना पहाटे चार वाजता बिबटे पोल्ट्रीत घुसल्याची जाणीव झाली. यावेळी त्यांनी पोल्ट्रीजवळ जाऊन पाहिले असता, बिबट्यांनी त्यांना पाहून पोल्ट्रीच्या कुंपणावरून उडी मारत उसाच्या शेतात पळ काढला.

शनिवारी (ता. सात) सकाळी अकोले वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल विठ्ठल पारधी यांनी घटनास्थळी जाऊन मृत आणि जखमी कोंबड्यांचा पंचनामा केला आहे. सुधीर बंगाळ या शेतकऱ्याचे सुमारे दीड लाख रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे. या सर्व मृत कोंबड्या खड्डा खोदून गाडून टाकण्यात आल्या. अकोले तालुक्यात बिबट्यांचा मोठा उपद्रव वाढला असून, वनविभागाने या ठिकाणी पिंजरे लावून बिबटे जेरबंद करण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थानी केली आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील

error: Content is protected !!
Exit mobile version