गोल पोस्ट कट्टा संस्कृती बीडमध्ये विधवा महिलांना मानाचं वाण, साजरी झाली कुंकवापलीकडची अनोखी संक्रांत!

बीडमध्ये विधवा महिलांना मानाचं वाण, साजरी झाली कुंकवापलीकडची अनोखी संक्रांत!

पुणे, २१ जानेवारी २०२३ : पती निधनानंतर पदरात पडलेलं वैधव्य यावर मात करीत बीडच्या आधुनिक सावित्रीने रूढी-परंपरांची बंधनं झुगारून, वैधव्य आलेल्या १०१ महिलांनी संक्रांतीच्या आदल्या दिवशीच तिळगुळाबरोबर विचारांचे वाण लुटत आगळी-वेगळी संक्रांत साजरी केली.

बीडच्या काकडहिरा गावात मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी गावातील विधवा महिलांनी एकत्रित येत कुंकवापलीकडची संक्रांत साजरी केली. गावातील १०१ विधवा महिलांना साडी वाटप करून तिळगूळ वाटप करत सुख-दुःखाचे वाण लुटण्यात आले. शहीद जवानांच्या पत्नी मनीषा जायभाये व जिल्हा परिषद शिक्षिका प्रतिभा हावळे यांच्या संकल्पानेतून हा उपक्रम गेल्या सहा वर्षांपासून घेण्यात येतो. या कार्यक्रमातून आम्हालाही सन्मानाने जगू द्या, अशी मागणी सामुदायिकपणे या महिलांनी केली आहे.
अपघाताने ऐन तारुण्यातच वैधव्य आलेल्या महिलेला समाजात दुय्यम स्थान दिले जाते. शुभकार्य असो; की सण-उत्सव. तसेच महिलांचा विशेष मकर संक्रातीसारखा सण असो; या वेळी मिळणारी वागणूक ही अपमानजनक असते. हेटाळणीच्या नजरेतून विधवा महिलेकडे पाहिले जाते. अपशकुनी समजलं जातं, आम्हीही माणूस आहोत, आम्हाला सन्मानाने जगू द्या, असे आवाहन प्रतिभाताई आणि मनीषाताई यांनी केले आहे.

काकडहिरा गावातील तब्बल १०१ महिला या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. पती निधनानंतर पहिल्यांदाच आम्ही अशी सार्वजनिक संक्रांत साजरी करीत आहोत. अगोदर घरामध्ये लपून बसावं लागायचं किंवा शेतामध्ये कामाला जायचं. संक्रांतीच्या दिवशी आमचं तोंडही पाहणं अपशकुनी समजलं जायचं; मात्र आता या कार्यक्रमामधून आमच्यातही वेगळं धाडस निर्माण झालं आणि आनंद वाटतो आहे, अशा प्रतिक्रिया महिलांनी व्यक्त केल्या.

या कार्यक्रमांमध्ये सहभागी झालेल्या महिलांच्या चेहऱ्यावर जोडीदार सोडून गेल्याचं दुःख होतंच; त्याआडून सन्मान मिळाल्याचा आनंदही होता. अनेक महिला कित्येक वर्षांनंतर या अशा प्रकारच्या सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. यावेळी एकमुखाने आम्हाला सन्मानानं जगू द्या. आमच्या आयुष्यात वैधव्य हे काय आमच्या इच्छेने आलेले आहे का? अपघाताने आमच्या वाट्याला आलेल्या या विधवापणामुळे आम्हाला सार्वजनिक कार्यक्रमात देखील सहभागी होण्याचा अधिकार दिला जात नाही. यामुळे आमची प्रचंड प्रमाणात घुसमट होते. अशा उपक्रमांमधून आम्हाला सामाजिक सुरक्षा मिळाल्याचा प्रत्यय येतो, असे महिलांनी व्यासपीठावर बोलून दाखविले.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील

error: Content is protected !!
Exit mobile version