गोल पोस्ट क्रिडा विश्व सिडनीत भारताचा विजय: रोहित शर्मा-विराट कोहली पुन्हा फॉर्ममध्ये, चाहत्यांचा आनंद दुहेरी झाला

सिडनीत भारताचा विजय: रोहित शर्मा-विराट कोहली पुन्हा फॉर्ममध्ये, चाहत्यांचा आनंद दुहेरी झाला

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरू आहे. या मालिकेतील तिसरा सामना सिडनीमध्ये झाला आणि भारताने हा सामना जिंकला. या सामन्यात विराट कोहली फॉर्ममध्ये परतला, तर रोहित शर्माने शतक झळकावले. मालिका भारताने गमावली असली तरी, दोघांना पुन्हा फॉर्ममध्ये पाहून चाहते आनंदित झाले.

ऑस्ट्रेलियाने प्रथम नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आणि २३६ धावांवर सर्वबाद झाले. नाणेफेकीचा त्यांना काहीच फायदा झाला नाही. लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने फक्त एकच विकेट गमावली. रोहित आणि विराटच्या शानदार खेळीमुळे ऑस्ट्रेलियाचे ‘क्लीन स्वीप’चे स्वप्न भंगले.

ऑस्ट्रेलियाने मालिका जिंकली असली तरी, भारतीय चाहत्यांना त्याचे काही दुःख नाही, कारण त्यांच्या लाडक्या “रोको” जोडीने (रोहित-कोहली) आज मैदान गाजवले.

  • रोहित शर्माने १२५ चेंडूत १२१ नाबाद धावा केल्या
  • विराट कोहलीने ८१ चेंडूत ७४ नाबाद धावा केल्या

दोघांनीही त्यांच्या निवृत्ती आणि फिटनेसवरील चर्चा थांबवल्या.

कर्णधार शुभमन गिलला फक्त २४ धावा करता आल्या, पण रोहित आणि विराटमुळे त्याला त्याच्या वनडे कर्णधारपदातील पहिला विजय मिळाला.
भारतासाठी हर्षित राणाने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.

विराट कोहली फॉर्ममध्ये परतताच एक मोठा विक्रम मोडला. आता विराटने वनडेमध्ये एकूण १४,२३५ धावा केल्या असून, श्रीलंकेचे माजी खेळाडू कुमार संगकारा (१४,२३४ धावा) यांना मागे टाकले आहे. त्यामुळे विराटने वनडेमधील सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसरे स्थान पटकावले आहे.

पहिल्या स्थानावर अजूनही क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर विराजमान आहेत. सचिन यांनी वनडेमध्ये एकूण १८,४२६ धावा केल्या आहेत.
विराटला हे विक्रम गाठण्यासाठी अजून सुमारे चार हजार धावांची गरज आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी ध्रुव पाटील

error: Content is protected !!
Exit mobile version