गोल पोस्ट राष्ट्रीय भारतीय महिला फुटबॉलच्या नव्या अध्यायाची सुरुवात…

भारतीय महिला फुटबॉलच्या नव्या अध्यायाची सुरुवात…

Historic Win for Indian Women's Football Team
भारतीय महिला फुटबॉलच्या नव्या अध्यायाची सुरुवात…

Historic Win for Indian Women’s Football Team: भारताच्या संगीता बासफोरे खाली गुडघ्यांवर कोसळली, तिच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. मैदानाच्या दुसऱ्या टोकाला स्कोअरबोर्ड चमकत होता. थायलंड 1-2 भारत. भारतीय संघाच्या डगआउटमधून निघालेला गोंगाट आता शांत झाला होता, फक्त खेळाडूंच्या हळुवार हुंदक्यांचा आवाज ऐकू येत होता.

या हुंदक्यांमागे वर्षानुवर्षांची मेहनत, स्वप्ने आणि महत्त्वाकांक्षा होत्या.
भारताच्या महिला फुटबॉल संघाने, म्हणजेच ब्लू टायग्रेसेसने, इतिहास रचला. आशियाई कपच्या पात्रता फेरीत थायलंडवर 2-1 असा विजय मिळवत भारताने 2026 मध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आशियाई कपसाठी तिकीट मिळवले.ही भारताची 2003 नंतर पहिलीच पात्रता आहे, जेव्हा सध्याच्या स्वरूपात पात्रता फेरी नव्हत्या. 2022 मध्ये भारताने यजमानपद भूषवले होते, पण कोविडच्या प्रादुर्भावामुळे संघाला माघार घ्यावी लागली होती. यंदा मात्र, ब्लू टायग्रेसेसने पात्रता फेरीतून थेट प्रवेश मिळवला.

संगीता बासफोरेची कमाल.

या सामन्याची खरी हिरो ठरली ती मिडफिल्डर संगीता बासफोरे. तिने दोन गोल झळकावत भारताला हा अविस्मरणीय विजय मिळवून दिला. 28 व्या मिनिटाला तिने पहिला गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या गोलने तिने सामन्यावर भारताची पकड घट्ट केली. प्रशिक्षक क्रिस्पिन चेट्ट्री यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने थायलंडला प्रत्येक आघाडीवर मात दिली.

थायलंडविरुद्ध पहिलाच विजय

भारताने याआधी थायलंडविरुद्ध महिला फुटबॉलमध्ये कधीच विजय मिळवला नव्हता. गेल्या वर्षी चीनमधील आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला थायलंडकडून 0-1 अशी हार पत्करावी लागली होती. पण यावेळी संगीता आणि तिच्या सहकाऱ्यांनी इतिहास बदलला. त्यांनी केवळ विजयच मिळवला नाही, तर भारतीय महिला फुटबॉलच्या नव्या अध्यायाची सुरुवात केली. संगीता बासफोरेच्या नेतृत्वाखाली आणि क्रिस्पिन चेट्ट्री यांच्या प्रशिक्षणात भारतीय संघाने दाखवले की मेहनत आणि जिद्द यांच्यासमोर कोणतीही अडचण टिकत नाही. थायलंडविरुद्धचा हा विजय केवळ एक सामना नाही, तर भारतीय महिला फुटबॉलच्या उज्ज्वल भविष्याची नांदी आहे. आता ब्लू टायग्रेसेस ऑस्ट्रेलियात आपली छाप पाडण्यासाठी तयार आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी,जुई काळे

error: Content is protected !!
Exit mobile version