कधीकाळी निर्मळ वाहिलेली, पण आता मैला आणि सांडपाण्याने प्रदूषित झालेली इंद्रायणी नदी आता पुन्हा एकदा शुद्ध होणार आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पांतर्गत ६७१ कोटी रुपयांच्या निधीतून तब्बल ३९ मलनिस्सारण केंद्र (एसटीपी) उभारणार आहे. यामुळे नदीच्या उगमापासून ते भीमा नदीत संगम होईपर्यंतचा ८७ किलोमीटरचा पट्टा प्रदूषणमुक्त होणार आहे.
सध्या अनेक लोकवस्त्यांमधील सांडपाणी थेट नदीत सोडले जाते, ज्यामुळे पाण्याचा दर्जा मोठ्या प्रमाणात घसरला आहे. नुकत्याच केलेल्या तपासणीत पाण्याच्या ऑक्सिजन पातळीत कमालीची घट झाल्याचे दिसून आले आहे, ज्यामुळे तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली होती. यावर उपाय म्हणून पीएमआरडीएने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पात ३९ एसटीपी केंद्रांची उभारणी तसेच पुढील १५ वर्षांसाठी त्यांची देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी पीएमआरडीएकडे असेल.
हा प्रकल्प तीन टप्प्यांमध्ये राबवला जाईल, ज्यामध्ये शहरी आणि ग्रामीण भागांचा समावेश आहे. यात लोणावळा, तळेगाव, आळंदी, वडगाव, देहू, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड यांसारख्या शहरांसह, कमी लोकसंख्या असलेल्या ४८ गावांचाही समावेश आहे. या गावांमध्ये सांडपाणी वाहून नेण्यासाठी स्वतंत्र वाहिन्या टाकल्या जाणार आहेत. याशिवाय, जलपर्णी निर्मूलन आणि घनकचरा व्यवस्थापनावरही विशेष लक्ष दिले जाईल.
या प्रकल्पासाठी एकूण १,७९७ कोटी रुपयांचा संयुक्त अहवाल तयार करण्यात आला आहे, ज्यामध्ये पीएमआरडीए हद्दीसाठी ८३७ कोटी तर पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीसाठी २६० कोटी रुपयांच्या कामांचा समावेश आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे इंद्रायणी नदीला पुन्हा एकदा तिचे जुने वैभव प्राप्त होईल, अशी आशा आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे