पुणे – वन्यजीव सप्ताह (दि. १ ते ४ ऑक्टोबर २०२५) निमित्ताने महाराष्ट्र वन विभागाच्या पुणे विभागातर्फे कडबनवाडी गवताळ क्षेत्र तसेच शिर्सुफळ, कुंभारगाव आणि भिगवन परिसरात फुलपाखरांचे शास्त्रीय सर्वेक्षण करण्यात आले. हे सर्वेक्षण नामवंत फुलपाखरू संशोधक व माजी सहाय्यक संचालक, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (BNHS), मुंबई येथील डॉ. राजू कसंबे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. डॉ. कसंबे हे फुलपाखरांवरील चार पुस्तकांचे लेखक असून गवताळ परिसंस्थेचा त्यांनी सखोल अभ्यास केलेला आहे.
या सर्वेक्षणामध्ये एकूण ४९ फुलपाखरांच्या प्रजातींची नोंद झाली असून त्यामध्ये कॉमन ग्रास डार्ट, लाईनब्लूज, क्रिमसन टिप, कॉमन थ्री-रिंग आणि कॉमन फायव्ह-रिंग या गवताळ प्रदेशाशी निगडीत प्रजातींचा समावेश आहे. तसेच कोरड्या गवताळ प्रदेशातील आफ्रिकन बाबूल ब्लू आणि ब्राईट बाबूल ब्लू या प्रजातींचीही नोंद करण्यात आली. या सर्व प्रजाती गवताळ आणि शुष्क प्रदेशातील जैवविविधतेचे वैशिष्ट्य अधोरेखित करतात.
लायसीनिडी (ब्लूज) या कुळातील प्रजाती सर्वाधिक नोंदल्या गेल्या असून पिएरीडी (व्हाईट्स आणि येलोज) या कुळातील प्रजाती त्यानंतरच्या क्रमांकावर होत्या.
हे सर्वेक्षण म्हणजे पुणे विभागातील गवताळ प्रदेशांतील जैवविविधतेचा शास्त्रीय अभ्यास करण्याच्या व्यापक उपक्रमाचा पहिला टप्पा आहे. या अंतर्गत गवतांच्या प्रजाती, वृक्ष आणि झुडूप प्रजाती, पक्ष्यांच्या प्रजाती तसेच फुलपाखरांच्या प्रजातींची सविस्तर माहिती एकत्रित करण्यात येत आहे.
हे कार्य इंदापूर, बारामती आणि सासवड वनपरिक्षेत्रातील गवताळ बहुल क्षेत्रात सुरू असून पहिला टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण झाला आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात अनुक्रमे हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात पुन्हा सर्वेक्षण करण्यात येऊन ऋतुजन्य प्रजातींमधील बदलांची नोंद घेण्यात येईल. संपूर्ण कार्य शास्त्रीय आणि नियोजनबद्ध पद्धतीने केले जात आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी दिनेश वढणे