पुणे २८ फेब्रुवारी २०२६: शहरातील अवैध धंदे, अभिलेखावरील गुन्हेगार, तडीपार इसम तसेच बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश पुणे पोलिस आयुक्तांनी दिल्यानंतर काळेपडळ पोलिसांनी प्रभावी कारवाई करत एका आरोपीकडून एक गावठी बनावटीचे पिस्तुल व दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.काळेपडळ पोलीस ठाणे हद्दीत तपास पथक पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार अतुल पंधरकर व शाहीद शेख यांना त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली. इरफान रईसउद्दीन मलीक हा दादा गुजर शाळेजवळ, साठेनगरकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या मोकळ्या जागेच्या कंपाऊंड भिंतीलगत संशयास्पद हालचाली करत असून त्याच्याकडे अग्निशस्त्र असल्याची शक्यता असल्याचे समजले. ही माहिती तत्काळ तपास पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे यांना कळविण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळी सापळा रचला. पोलिसांना पाहताच संशयित इसम घाबरून पळू लागला.
मात्र पोलिसांनी चोहोबाजूंनी घेराव घालत शिताफीने त्याला ताब्यात घेतले. पंचासमक्ष घेतलेल्या अंगझडतीदरम्यान आरोपीकडून एक गावठी बनावटीचे पिस्तुल व दोन जिवंत काडतुसे असा एकूण सुमारे ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या प्रकरणी आरोपी इरफान रईसउद्दीन मलीक (रा. संकेतविहार, काळेपडळ, पुणे) याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३(२५), ३(५) तसेच मुंबई पोलीस कायदा कलम ३७(१)(३) सह १३५ अन्वये काळेपडळ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई राजकुमार शिंदे (पोलीस उपआयुक्त, परिमंडळ ६), अनुराधा उदमले (सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली, मानसिंग पाटील (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, काळेपडळ पोलीस ठाणे) यांच्या सूचनेनुसार पार पडली.
सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे, पोलीस उपनिरीक्षक विनायक गुरव, पोलीस हवालदार प्रविण काळभोर, दाऊद सय्यद, प्रतिक लाहिगुडे, विशाल ठोंबरे, शाहीद शेख, लक्ष्मण काळे, अतुल पंधरकर, सद्दाम तांबोळी, प्रदीप बेडीस्कर, महादेव शिंदे आणि गिरीराज जगदाळे यांच्या पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी बजावली. शहरात बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात कारवाईची मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
न्युज अनकट प्रतिनीधी: दिनेश वढणे
