गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे सुरक्षितता आणि संवादासाठी महिला प्राचार्याची मागणी, कासारवाडी ‘आयटीआय’मधील विद्यार्थिनींचा सवाल

सुरक्षितता आणि संवादासाठी महिला प्राचार्याची मागणी, कासारवाडी ‘आयटीआय’मधील विद्यार्थिनींचा सवाल

For safety and better communication, students of Kasarwadi Girls’ ITI demand the appointment of a woman principal.

पिंपरी-चिंचवडमधील कासारवाडी येथे केवळ मुलींसाठी असलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये (आयटीआय) सध्या पुरुष प्राचार्य कार्यरत असल्याने विद्यार्थिनींनी त्यांच्या समस्या मांडताना संकोच वाटत असल्याची भावना व्यक्त केली आहे. त्यामुळे संस्थेच्या प्रमुखपदी महिला प्राचार्यांची नियुक्ती करण्याची मागणी जोर धरत आहे. सध्या ११६ विद्यार्थिनी असलेल्या या संस्थेत प्राचार्यांसह चार पुरुष आणि पाच महिला कर्मचारी आहेत.

काही दिवसांपूर्वी एका बाहेरील पुरुषाने चुकून मुलींच्या स्वच्छतागृहात प्रवेश केल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. या घटनेनंतर महापालिकेने तात्काळ महिला सुरक्षारक्षकाची नेमणूक केली असली तरी, विद्यार्थिनींना शैक्षणिक, वैयक्तिक किंवा प्रशासकीय समस्यांवर मोकळेपणाने चर्चा करण्यासाठी महिला प्राचार्यांची गरज असल्याचे वाटत आहे. विद्यार्थिनींच्या मते, महिला प्राचार्य असल्यास संवाद अधिक सोपा होईल आणि त्यांच्या अडचणी समजून घेणे अधिक सहज शक्य होईल.

सध्याचे पुरुष प्राचार्य चांगले काम करत असून त्यांच्या विरोधात कोणतीही तक्रार नसल्याचे विद्यार्थिनी आणि महिला कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, मुलींच्या सुरक्षितता आणि संवाद साधण्याच्या सोयीसाठी महिला प्राचार्यांची नेमणूक होणे आवश्यक आहे, असे मत विद्यार्थिनींनी व्यक्त केले आहे. शासनाचा असा कोणताही नियम नसला तरी, मुलींच्या भावना आणि गरजा लक्षात घेऊन ही मागणी पूर्ण होते का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे

error: Content is protected !!
Exit mobile version