गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे महापालिकेच्या ‘खेळाडू दत्तक योजने’ला घरघर, फक्त कागदी घोडे नाचवले जात असल्याचा खेळाडूंचा...

महापालिकेच्या ‘खेळाडू दत्तक योजने’ला घरघर, फक्त कागदी घोडे नाचवले जात असल्याचा खेळाडूंचा आरोप

पिंपरी-चिंचवड महापालिकेने खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी सुरू केलेल्या खेळाडू दत्तक योजने ची अंमलबजावणी केवळ कागदोपत्रीच होत असल्याचा आरोप खेळाडू आणि त्यांच्या पालकांनी केला आहे. गेल्या वर्षी अर्ज मागवूनही एकाही खेळाडूला मदत मिळाली नाही. यंदाही अर्ज मागवण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून ३८ खेळाडूंनी अर्ज केले आहेत. परंतु, प्रशासकीय दिरंगाईमुळे ही योजना फक्त औपचारिकता बनली असल्याची भावना व्यक्त होत आहे.

ही योजना खेळाडूंना त्यांच्या यश आणि क्रीडा प्रकारानुसार २५ हजार ते एक लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत देते. या निधीचा उपयोग आहार, प्रशिक्षण, क्रीडा साहित्य आणि प्रवासासाठी होतो. अनेक स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी खेळाडूंना मोठा खर्च करावा लागतो, अशा वेळी महापालिकेची मदत त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची ठरते. मात्र, गेल्या वर्षातील अनुभवामुळे खेळाडूंच्या मनात निराशेची भावना आहे.

गतवर्षी प्रशासनाने अर्ज स्वीकारले, पण पुढील कोणतीही कार्यवाही केली नाही. परिणामी, वर्षभर खेळाडू मदतीची वाट पाहत राहिले. यंदा पुन्हा अर्ज मागवल्यावरही खेळाडूंच्या मनात संभ्रम होता. तरीही, ३८ खेळाडूंनी या आशेने अर्ज केले आहेत की या वर्षी तरी त्यांना लाभ मिळेल.

या संदर्भात, क्रीडा विभागाच्या उपायुक्त पंकज पाटील यांनी सांगितले की, “पुढील दोन ते तीन महिन्यांत सर्व प्रक्रिया पूर्ण करून खेळाडूंना निधी वितरित करण्यासाठी प्रयत्नशील आहोत.” मात्र, खेळाडूंच्या मते, हा निधी तसाच तुटपुंजा आहे आणि त्यातही दिरंगाई होत असल्याने शहरातील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंची संख्या नगण्य होत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे

error: Content is protected !!
Exit mobile version