गोल पोस्ट आरोग्य पुणे पिंपरी-चिंचवड मध्ये कडक लॉक डाऊन करा: अजित पवार

पुणे पिंपरी-चिंचवड मध्ये कडक लॉक डाऊन करा: अजित पवार

पुणे: कोरोनाचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र आणि केंद्र सरकार योग्य पावलं उचलत आहे. मात्र नागरिकांनी गर्दी कमी करुन कोरोनाचा संसर्ग टाळायला हवा. पुण्यातील गर्दी अद्याप कमी झालेली नाही. त्यामुळे पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये आठ दिवस अत्यंत कडक टाळेबंद करावे असे अजित पवार यांनी सांगितले. पुण्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आणि मृत्यू दर लक्षात घेता पुणे शहर व पिंपरी चिंचवड परिसरात लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करावी, कोरोना बाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात येण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले.

पुणे  येथील विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करण्यात आली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संबंधित विभागांकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजना व करावयाच्या कार्यवाहीबाबत आढावा घेतला. यावेळी बोलताना ते म्हणाले, ”पुण्यात वाढणारे कोरोनाबाधित रुग्ण ही चिंतेची बाब आहे. कुठल्याही परिस्थितीत त्यास प्रतिबंधीत करणे आवश्यक आहे. त्यासाठी शासनाकडून जी काही मदत लागेल ती आम्ही देण्यास तयार आहोत. पोलीस प्रशासनाने पाहिजे तर कडक धोरण अवलंबवावे. त्यासाठी आठ दिवस कडक लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही. यासाठी नागरिक प्रशासनाला निश्चितच सहकार्य करतील,”

या बैठकीला राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार डॉ. अमोल कोल्हे, विभागीय आयुक्त  डॉ. दीपक म्हैसेकर, पुणे शहराचे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील आदींसह वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

error: Content is protected !!
Exit mobile version