मावळ तालुक्यातील पिंपरी-चिंचवड शहराच्या सीमेवर असलेला आणि वाढत्या शहरीकरणामुळे ‘सर्वात सधन’ ओळखला जाणारा सोमाटणे–चांदखेड जिल्हा परिषद गट यावेळी चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. मागील निवडणुकीतील इंदोरी–सोमाटणे आणि महागाव–चांदखेड या दोन गटांचे विभाजन होऊन या नव्या गटाची निर्मिती झाली आहे. त्यामुळे येथील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची चिन्हे दिसत आहेत.
सोमाटणे, शिरगाव आणि गहुंजे या भागांतील उच्चभ्रू सोसायट्यांमधील मतदार आणि दुसऱ्या बाजूला ग्रामीण भागातील मतदार असा या गटाचा अनोखा संगम आहे. उर्से येथील औद्योगिक क्षेत्र, गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम आणि प्रस्तावित रिंगरोड यामुळे या गटाचे महत्त्व आणखी वाढले आहे. या गटात एकूण ४५,७७५ मतदार असून त्यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.
या गटासाठी ‘सर्वसाधारण स्त्री’ प्रवर्गाचे आरक्षण जाहीर झाल्याने अनेक इच्छुक नेत्यांनी त्यांच्या पत्नींना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू केली आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, जर महायुतीत मतभेद झाले तर या सधन गटात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये थेट आणि अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे.
मागील निवडणुकीत सोमाटणे गणात राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले होते, तर चांदखेड गणात भाजपने विजय मिळवला होता. त्यामुळे आता नव्याने तयार झालेल्या या गटात कोण बाजी मारणार, याकडे मावळवासियांचे लक्ष लागले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी ध्रुव पाटील