गोल पोस्ट इतर राजकारण मनसेचा उद्धव ठाकरे यांना युतीचा प्रस्ताव, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र...

मनसेचा उद्धव ठाकरे यांना युतीचा प्रस्ताव, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार?

मुंबई, ६ जुलै २०२३ : उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडी केली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड करत भाजपशी हातमिळवणी केली. यानंतर वंचित बहुजन आघाडीने ठाकरे गटाशी युती केली, आणि आता अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडून भाजपशी बांधलेले सांधण यामुळे राज्यातील राजकीय समीकरण बदलून गेले आहे. राज्यात नवीन राजकीय समीकरणे निर्माण झालेली असतानाच दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे म्हणून हालचाली सुरू झाल्या आहेत. या दोन्ही नेत्यांनी एकत्र यावेत म्हणून मुंबई आणि ठाण्यात बॅनर्स लागले होते. अशातच आज मनसे नेते अभिजित पानसे यांनी खासदार संजय राऊत यांची भेट घेतली.

मनसेकडून उद्धव ठाकरे गटाला युतीचा प्रस्ताव दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार गट भाजपसोबत गेल्यामुळे मनसेकडून हा प्रस्ताव दिला गेला असल्याचे सांगितले जात आहे. राज ठाकरे यांचे अत्यंत जवळचे मनसे नेते अभिजीत पानसे यांनी आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली.

दैनिक सामनाच्या कार्यालयात जाऊन अभिजीत पानसे यांनी राऊत यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी संजय राऊत यांना युतीचा प्रस्ताव दिल्याचे सांगितले जात आहे. राजकीय वर्तुळात या भेटीमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली असून राज्यात आणखी नवीन राजकीय समीकरण उदयास येण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.दरम्यान माध्यमांना प्रतिक्रिया देताना मी माझ्या वैयक्तिक कामासाठी संजय राऊत यांच्याकडे आलो होतो, याचा राजकिय घडामोडींशी काही संबंध नाही असे अभिजित पानसे म्हणाले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

error: Content is protected !!
Exit mobile version