गोल पोस्ट महाराष्ट्र ‘मंकीपॉक्स’ची भारतात धडक! पहिला रुग्ण धुळ्यात, आरोग्य यंत्रणा सज्ज

‘मंकीपॉक्स’ची भारतात धडक! पहिला रुग्ण धुळ्यात, आरोग्य यंत्रणा सज्ज

जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या ‘मंकीपॉक्स‘ (एमपॉक्स) या संसर्गजन्य आजाराने अखेर महाराष्ट्रात प्रवेश केला आहे. राज्याचा पहिला रुग्ण धुळ्यात आढळल्याने आरोग्य यंत्रणा तत्काळ सज्ज झाली आहे. संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी बाधित रुग्णाला विलगीकरणात ठेवण्यात आले असून त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांची तातडीने तपासणी सुरू आहे.

ऑर्थोपॉक्स व्हायरस‘ गटातील या विषाणूमुळे होणारा हा आजार प्रामुख्याने प्राण्यांपासून माणसांमध्ये आणि नंतर व्यक्ती-व्यक्तीमध्ये संपर्क, संक्रमित वस्तू आणि श्वसनावाटेही पसरू शकतो. विशेषतः संक्रमित व्यक्तीच्या पुरळांमधील द्रव, कपडे, बिछाना आणि लैंगिक संबंधातूनही संसर्ग होण्याची शक्यता असते. ‘डब्ल्यूएचओ’नुसार १०० हून अधिक देशांमध्ये लाखो रुग्ण आढळले आहेत.

मंकीपॉक्स‘ आणि सामान्य ‘माकडताप‘ पूर्णपणे वेगळे आहेत हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. ‘मंकीपॉक्स’ची प्रमुख लक्षणे म्हणजे: तीव्र ताप, डोकेदुखी, अंगदुखी, थकवा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे चेहरा, हात, तळहात, पाय किंवा शरीरावर पाण्याच्या फोडांसारखे पुरळ येणे. यासोबतच गळ्यात किंवा मानेजवळ लिम्फ नोड्स सुजणे हे देखील एक वैशिष्ट्यपूर्ण लक्षण आहे. पुरळ फुटल्यानंतर त्यावर खपली येते.

या आजारावर नियंत्रण मिळवण्याचे प्रमुख साधन म्हणजे ‘संसर्गाचे लवकर निदान आणि तातडीने विलगीकरण’. प्रशासनाने तातडीने पाऊले उचलल्याने धुळ्यातील संसर्ग नियंत्रणात आहे, मात्र नागरिकांनी लक्षणे आढळल्यास तत्काळ आरोग्य विभागाशी संपर्क साधून सहकार्य करणे अत्यंत आवश्यक आहे. दक्षता आणि जागरूकता हीच या संकटावर मात करण्याची गुरुकिल्ली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे

error: Content is protected !!
Exit mobile version