गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे पुणे जिल्ह्यात सर्वाधिक पाणी टंचाई

पुणे जिल्ह्यात सर्वाधिक पाणी टंचाई

पुणे, २२ मे २०२३: पुणे विभागातील सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यात सध्या एकही टँकर सुरू झालेल्या नाही. मात्र, सातारा जिल्ह्यात बारा टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात असून, विभागात सर्वाधिक ३३ टँकर हे पुणे जिल्ह्यात सुरू करावे लागले आहेत. विशेष म्हणजे यातील तीन टँकर हे शासकीय असून, उर्वरित ३० टँकर हे खाजगी असल्याची माहिती समोर आली आहे.

गेल्या वर्षी झालेल्या पावसामुळे सध्या अनेक धरणांत पुरेसा पाणीसाठा असून, त्यामुळे तुलनेत पाणी टंचाई जाणवत नाही. तरीही पुणे विभागातील सातारा आणि पुणे जिल्ह्यात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. तर उर्वरित कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात सध्या एकही टँकर सुरू नाही. पुणे जिल्ह्यांतील ३३ टँकरद्वारे ४२ गावे आणि १९२ वाड्यांतील ६६ हजार ६०९ नागरिकांना पाणी पुरविले जात आहे. त्यामध्ये आंबेगाव तालुक्यात १२, जुन्नर आणि खेड तालुक्यातील प्रत्येकी नऊ टँकर सुरू आहेत. पाणी पुरवठ्यासाठी २७ विहीर आणि बोअरचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

सातारा जिल्ह्यात १२ टँकरद्वारे १३ गावे आणि ४३ वाड्यातील सुमारे १६ हजार नागरिकांना पाणी पुरविले जात आहे. विशेष म्हणजे साडेतीन हजार जनावरांनाही पाणी टंचाईचा फटका सहन करावा लागत आहे. सातारा जिल्ह्यात सुरू असलेल्या १२ टँकरपैकी ९ टँकर हे शासकीय तर तीन टँकर खाजगी आहेत. याउलट पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या ३३ टँकरपैकी केवळ तीन टँकर हे शासकीय आहेत. तर उर्वरित ३० टँकर हे खाजगी आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

error: Content is protected !!
Exit mobile version