गोल पोस्ट इतर राजकारण माझ्या कार्यालयाला स्वतंत्र सोशल मीडिया यंत्रणेची गरज नाही, आमचे काम बोलते: अजित...

माझ्या कार्यालयाला स्वतंत्र सोशल मीडिया यंत्रणेची गरज नाही, आमचे काम बोलते: अजित पवार

मुंबई, १४ मे २०२१: उपमुख्यमंत्री कार्यालयाचा सोशल मीडिया सांभाळण्यासाठी बाह्ययंत्रणा नियुक्त करण्याची बिलकूल गरज नाही. यासंदर्भातील शासननिर्णय तात्काळ रद्द करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. उपमुख्यमंत्री कार्यालयाला समाजमाध्यमांवर स्वतंत्रपणे कार्यरत राहण्याची गरज वाटत नाही,असं मत अजित पवारांनी व्यक्त केलंय. सद्यस्थितीत उपलब्ध जनसंपर्क व्यवस्थेद्वारेच यापुढेही नागरिकांशी, प्रसिद्धी माध्यमांशी संवाद ठेवण्यात येईल, असंही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलंय.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयासाठी स्वतंत्र समाज माध्यमयंत्रणा नियुक्त करण्यासाठीचा शासननिर्णय परवा रात्री जारी झाला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार हे अनावश्यक प्रसिद्धीपासून दूर राहत असल्यामुळं या शासन निर्णयाबद्ल आश्चर्य व्यक्त करण्यात येत होतं. आता खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच त्यांच्या कार्यालयासाठी स्वतंत्र सोशल मीडिया सांभाळणाऱ्या यंत्रणेची गरज नसल्याचं स्पष्ट केलं असल्यानं यासंदर्भातील शासन निर्णय रद्द करण्यात येणार आहे.

शासन निर्णय काय होता?

सामान्य प्रशासन विभागाने बुधवारी यासंदर्भातील आदेश जारी केले होते. या आदेशात अजित पवार यांची सोशल मीडियावरील खाती सांभाळण्यासाठी आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एखादी बाहेरची कंपनी नियुक्त करण्यात येणार होती. ही कंपनी अजित पवार यांचे ट्विटर, फेसबुक, ब्लॉगर, यूट्युब आणि इन्स्टाग्राम खात्याचे काम बघणार होती. याशिवाय, व्हॉटसअप बुलेटिन, टेलिग्राम आणि एसएमएस पाठवण्याची जबाबदारीही या कंपनीवर देण्यात येणार होती. यासाठी सहा कोटी रुपयांचा खर्च येणार होता.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

error: Content is protected !!
Exit mobile version