अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यात काेराेनाचा एकही रुग्ण नाही. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन नगरचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले आहे.
मंगळवारी दुबई ट्रिपवरुन नगरमध्ये परतलेल्या चौघा संशयितांची तपासणी करण्यात आली आहे. त्यांच्यात काेराेनाचे कोणतेही लक्षण आढळून आलेले नाहीत.
जिल्ह्यात बुधवार दि.११ मार्चपर्यंत एकही काेराेनाग्रस्त रूग्ण आढळून आलेला नाही. नागरिकांनी अफवांना बळी न पडता आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी केले आहे.
कोरोनाचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सज्ज असून प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
पुण्यात दुबईहून परतलेल्या दाम्पत्याला काेराेनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर दुबईहून परतलेल्या राज्यातील लोकांची यादीच समाज माध्यमांवर व्हायरल झाली आहे.
यात नगरमधील एकाच कुटुंबातील चौघांचा समावेश आहे. यादी व्हायरल झाल्यावर जिल्हा प्रशासनाने संबंधित लोकांशी संपर्क साधून त्यांची प्राथमिक तपासणी केली. यात त्यांना काेराेनाशी संबंधित लक्षणे आढळून आलेली नाहीत. त्यामुळे लोकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता फक्त काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी व्दिवेदी यांनी केले आहे.