गोल पोस्ट महाराष्ट्र रायगडच्या पेणमध्ये पाणी प्रश्नावरून नागरिकांचे सातव्या दिवशीही आमरण उपोषण सुरू, महाराष्ट्र शासनाला...

रायगडच्या पेणमध्ये पाणी प्रश्नावरून नागरिकांचे सातव्या दिवशीही आमरण उपोषण सुरू, महाराष्ट्र शासनाला वाहिली श्रद्धांजली

पेण, रायगड १४ डिसेंबर २०२३ : पेण तालुक्यातील खारेपाट भागातील नागरिक आणि शेतकऱ्यांना पिण्याचे तसेच सिंचनाचे हक्काचे पाणी मिळावे, यासाठी येथील नऊ नागरिकांचे विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून आमरण उपोषण सुरू आहे. आज सातव्या दिवशी देखील उपोषणाची दखल न घेणाऱ्या जलसंपदा विभाग आणि महाराष्ट्र शासनाला पेण खारेपाट विभागाच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. ही श्रध्दांजली वाहण्यासाठी या भागातील माहीला वर्ग, जेष्ठ नागरिक, लहान मुले, विद्यार्थी यांसह शेकडो ग्रामस्थ आणि शेतकरी उपस्थित होते.

पेण तालुक्यातील हेटवणे धरण मध्यम प्रकल्पाच्या कालव्याचे काम गेली सोळा वर्षांपासून प्रलंबित आहे. याच पाण्यावर येथील ५२ गावांमधील ४२६८ हेक्टर सिंचन क्षेत्र आणि हजारो नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अवलंबून आहे. मात्र सोळा वर्षे होऊन गेली तरी हे काम का पुर्ण होत नाही. हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे आणि तशा प्रकारचे लेखी पत्र राज्य शासनाचे द्यावे तसेच या कालव्याच्या पुढील कामाचे नियोजन करण्याकरता प्रकल्पास सुधारीत प्रशासकीय मान्यता मिळावी, यासाठी आमरण उपोषण सुरू केले आहे. या कोणत्याही गोष्टीकडे आणि आमरण उपोषणाकडे अधिवेशन सुरू होऊन सात दिवस झाले तरी गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याने आज सायंकाळी उपोषणाची दखल न घेणाऱ्या जलसंपदा विभाग आणि महाराष्ट्र शासनाला पेण खारेपाट विभागाच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

न्यूज अनकट प्रतिनिधी : दत्तात्रय शेडगे

error: Content is protected !!
Exit mobile version