गोल पोस्ट पुणे बातम्या शिंदे-पवारांना डावलून बावनकुळेंकडून पिंपरी-चिंचवड अतिरिक्त आयुक्तपदी थेट नियुक्ती!

शिंदे-पवारांना डावलून बावनकुळेंकडून पिंपरी-चिंचवड अतिरिक्त आयुक्तपदी थेट नियुक्ती!

युती सरकारमध्ये अंतर्गत धुसफूस? महसूल विरुद्ध नगरविकास संघर्ष तीव्र!

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदावर महसूल व वन विभागाने अपर जिल्हाधिकारी मोनिका सूरजपालसिंह ठाकूर यांची थेट नियुक्ती केल्याने प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, ही नियुक्ती उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना डावलून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विभागाने परस्पर केली आहे.

महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त पदासारख्या महत्त्वाच्या जागेवर नियुक्ती करताना प्रशासकीय नियंत्रक विभाग म्हणून नगरविकास विभागाची मान्यता आवश्यक असते. मात्र, महसूल विभागाने २० ऑक्टोबरला शासन आदेश जारी करत ठाकूर यांची थेट नियुक्ती केली. यापूर्वीही महसूल विभागाने अशा नियुक्त्या परस्पर केल्या आहेत. नगरविकास विभागाने ८ जानेवारी २०२१ रोजी सर्व आयुक्तांना स्पष्ट आदेश दिले आहेत की, नगरविकास विभागाच्या स्वयंस्पष्ट आदेशाशिवाय अन्य कोणत्याही विभागाने परस्पर नियुक्ती केलेल्या अधिकाऱ्याला रुजू करून घेऊ नये.

महसूल विभागाने हे नियम डावलल्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त कोंडीत सापडले आहेत. तसेच, विद्यमान अतिरिक्त आयुक्त जांभळे-पाटील यांच्या बदलीचा आदेश येण्यापूर्वीच ही नियुक्ती झाल्याने प्रशासनामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

मावळते अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांचा कार्यकाल संपल्याने या जागेसाठी जोरदार राजकीय आणि प्रशासकीय लॉबिंग सुरू होते. भाजपच्या मंत्र्यांनी युतीतील महत्त्वाच्या नेत्यांना डावलून घेतलेला हा परस्पर निर्णय महायुतीतील अंतर्गत राजकीय संघर्षाला हवा देणारा ठरला आहे. यामुळे शिंदे आणि पवार गट नाराज असल्याची चर्चा आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: सोनाली तांबे

error: Content is protected !!
Exit mobile version