गोल पोस्ट गुन्हे चेंबर दुर्घटनेतील मृतांना न्याय कधी? केंद्रीय मंत्रालयाची गंभीर दखल!

चेंबर दुर्घटनेतील मृतांना न्याय कधी? केंद्रीय मंत्रालयाची गंभीर दखल!

स्वातंत्र्य दिनाच्या शुभ दिवशी पिंपरी-चिंचवड प्राधिकरणातील एका दुर्दैवी घटनेत तीन कामगारांचा चेंबरमध्ये गुदमरून मृत्यू झाला होता. या हृदयद्रावक घटनेला चार महिने उलटूनही मृतांच्या कुटुंबीयांना अद्याप कोणतीही भरपाई मिळालेली नाही, हे अत्यंत गंभीर आहे. अखेर, या प्रकरणाची केंद्र सरकारच्या केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाने गंभीर दखल घेतली आहे, ज्यामुळे पीडितांना न्याय मिळण्याची आशा पल्लवित झाली आहे.

राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सचिव कश्यप यांची भेट!

केंद्रीय मंत्री वीरेंद्र कुमार यांच्या सूचनेनुसार, राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सचिव राहुल कश्यप यांनी पिंपरी-चिंचवडला भेट दिली. त्यांनी थेट घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि संपूर्ण प्रकरणाची सखोल माहिती घेतली. यावेळी जिल्हा संरक्षण समितीचे सदस्य सागर चरण यांनी महापालिका, पोलीस आणि बीएसएनएलने या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिले नाही, याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.

भरपाई द्या, जबाबदारी निश्चित करा – सचिवांचे स्पष्ट निर्देश!

सचिवांनी स्पष्ट शब्दांत सूचना केल्या आहेत की, चेंबरमध्ये मृत्युमुखी पडलेल्या कामगारांना त्वरित भरपाई देण्यात यावी. तसेच, या अपघाताला जबाबदार कोण? त्या कामगारांना कोणी चेंबरमध्ये उतरवले? या प्रश्नांची जबाबदारी निश्चित करून दोषींवर योग्य ती चौकशी करावी. दुर्देवाने, घटनेनंतर पंधरा दिवसांनी ठेकेदारावर गुन्हा दाखल झाला असला तरी, बीएसएनएलचे दोषी कोण याचा शोध पोलिसांना अजूनही लागलेला नाही.

न्यायासाठी संघर्ष!

केंद्रीय मंत्रालयाच्या या हस्तक्षेपामुळे आता या प्रकरणाला गती मिळण्याची शक्यता आहे. या दुर्घटनेतील पीडित कुटुंबांना कायद्यानुसार भरपाई मिळणे आणि दोषींवर कडक कारवाई होणे, हीच खरी श्रद्धांजली ठरेल. सर्वसामान्यांच्या न्यायासाठी हा संघर्ष आता एका महत्त्वाच्या टप्प्यावर आला आहे!

न्यूज अनकट प्रतिनिधी: सोनाली तांबे

error: Content is protected !!
Exit mobile version