Pimpri Chinchwad Matrimonial Scam: मेट्रोमोनियल साईटवरून झालेल्या ओळखीचा फायदा घेत एका व्यक्तीने महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिची ११ लाख ८१ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना शिरगाव येथे १७ नोव्हेंबर २०२४ ते १७ जानेवारी २०२५ या कालावधीत घडली. या प्रकरणी पीडित महिलेने गुरुवारी (२४ जुलै) फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी राकेश रवीकुमार शेट्टी (रा. दक्षिण कन्नडा, कर्नाटक) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेची ‘जीवांसाठी डॉट कॉम’ (jeevansathi.com) या मेट्रोमोनियल साईटवर आरोपी राकेश शेट्टीसोबत ओळख झाली. शेट्टीने महिलेला मेसेज आणि फोन करून तिच्याशी जवळीक साधली. हळूहळू त्याने महिलेला लग्नाचे स्वप्न दाखवले आणि तिच्या विश्वासाचा फायदा घेतला.
या विश्वासाचा गैरवापर करत आरोपी शेट्टीने महिलेच्या क्रेडिट कार्ड्स, विविध लोन अॅप्स आणि बँक अॅप्सचा वापर करून तिच्या नावावर एकूण ११ लाख ८१ हजार ७५१ रुपयांचे कर्ज घेतले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने पोलिसांशी संपर्क साधला.
लग्न जुळवण्याच्या पवित्र उद्देशाने वापरल्या जाणाऱ्या मेट्रोमोनियल साईट्सवर अशा प्रकारे फसवणुकीचे प्रकार वाढताना दिसत आहेत. ऑनलाइन ओळखीवर लगेच विश्वास न ठेवता, आर्थिक व्यवहार करताना अधिक सावधगिरी बाळगण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पिंपरी पोलीस करत आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे
