गोल पोस्ट गुन्हे वार्ता मॅट्रिमोनी साईटवर फसवणूक घटस्फोटित महिलेला लग्नाचे आमिष!

मॅट्रिमोनी साईटवर फसवणूक घटस्फोटित महिलेला लग्नाचे आमिष!

मॅट्रिमोनियल वेबसाइट्सचा वापर करून महिलांची फसवणूक करणाऱ्या एका उच्चशिक्षित आणि चाणाक्ष आरोपीला वाकड पोलिसांनी दिल्लीतून अटक केली आहे. आलोक अजयकुमार पुरोहित (वय ४३, रा. जयपूर) नावाच्या या व्यक्तीने लग्नाचे खोटे आमिष दाखवून एका घटस्फोटित महिलेची केवळ फसवणूकच केली नाही, तर तिच्यावर लैंगिक अत्याचार देखील केले. त्याच्या या कृत्यामुळे वैवाहिक संकेतस्थळांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेने २७ सप्टेंबर रोजी फिर्याद दाखल केली. पुरोहित याने ‘जीवनसाथी डॉट कॉम’, ‘शादी डॉट कॉम’ आणि ‘आयआयटीएमशादी डॉट कॉम’ यांसारख्या लोकप्रिय वेबसाइट्सवर स्वतःला अविवाहित भासवून महिलेसोबत ओळख वाढवली.

विश्वास संपादन केल्यानंतर पुण्यात येऊन त्याने तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले. पुढे तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ काढून तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.

फसवेगिरीचा पर्दाफाश

७ ऑक्टोबर रोजी वाकड पोलिसांनी तातडीने कारवाई करत पुरोहितला दिल्लीतून बेड्या ठोकल्या. तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. मनुष्यबळ पुरवठा करणारा व्यवसाय करणाऱ्या या आरोपीने पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्यावर दुसरे लग्न केले, मात्र तरीही तो विविध संकेतस्थळांवर खोट्या माहितीसह नोंदणी करून उच्चशिक्षित महिलांना फसवत होता.

त्याच्या फसवणुकीमध्ये इतर राज्यांतील महिलांचाही समावेश आहे. त्याच्या या कृत्याबद्दल दुसऱ्या पत्नीला कोणतीही माहिती नव्हती.

वरिष्ठ निरीक्षक वनिता धुमाळ या प्रकरणाचा तपास करत असून, मॅट्रिमोनियल साइट्सवर ओळख करताना सतर्क राहण्याची गरज या घटनेने अधोरेखित केली आहे. महिलांनी कोणत्याही व्यक्तीवर विश्वास ठेवण्यापूर्वी त्याची सखोल माहिती तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: सोनाली तांबे

error: Content is protected !!
Exit mobile version