गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीची तयारी मतदारयादी विभाजनाचे काम आजपासून सुरू!

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीची तयारी मतदारयादी विभाजनाचे काम आजपासून सुरू!

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बहुप्रतिक्षित निवडणुकीच्या तयारीला आता प्रशासकीय स्तरावर कमालीचा वेग आला आहे. निवडणुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या प्रभागनिहाय मतदारयाद्या विभाजनाचे कामकाज आज, शनिवार (दि. १८) पासून महापालिका स्तरावर युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.

या कामासाठी चिन्हांकित प्रगणक, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) आणि पर्यवेक्षक यांना नुकतेच सविस्तर प्रशिक्षण देण्यात आले आहे. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात झालेल्या या महत्त्वपूर्ण प्रशिक्षण कार्यक्रमात महापालिकेचे सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे प्रगणक, बीएलओ आणि पर्यवेक्षकांची नेमकी भूमिका व जबाबदारी स्पष्ट केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, पिंपरी, चिंचवड, भोसरी आणि अंशतः भोर या विधानसभा मतदारसंघांची १ जुलै २०२५ ची अंतिम मतदार यादी आधारभूत मानली जाणार आहे. ही यादी महापालिकेच्या ३२ प्रभागांसाठी विभाजित करून अंतिम मतदार यादी तयार केली जाईल.

अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, मतदार याद्या विभाजित करण्याच्या प्रक्रियेत येणाऱ्या प्रगणकांना आवश्यक ती माहिती देऊन सहकार्य करावे. तसेच, कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट निर्देशही त्यांनी दिले आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे

error: Content is protected !!
Exit mobile version