गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे उद्योगनगरीची दिवाळी झाली ‘धान्या’शिवाय अपुरी!

उद्योगनगरीची दिवाळी झाली ‘धान्या’शिवाय अपुरी!

दीड लाख शिधापत्रिकाधारक कुटुंबांना प्रतीक्षा!

पिंपरी-चिंचवड शहरातील सुमारे दीड लाख शिधापत्रिकाधारक कुटुंबांची दिवाळी यंदा धान्याशिवाय अपुरी राहिली आहे. दिवाळीचा सण उलटून गेला तरी, ऑक्टोबर महिन्यातील सुमारे ३० टक्के धान्य वितरण अजूनही बाकी असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

पुरवठा विभागाने येत्या ३१ ऑक्टोबरपर्यंत वितरण सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे, मात्र दिवाळीच्या तोंडावर धान्य न मिळाल्याने अनेक कुटुंबांना सणाचा आनंद पूर्णपणे घेता आला नाही.

शहरातील ४ लाख ९३ हजार ८७४ शिधापत्रिकाधारकांपैकी २४ ऑक्टोबरपर्यंत सरासरी ७५ टक्के लाभार्थ्यांनी धान्य उचल केली आहे. चिंचवड (७३.९० टक्के), पिंपरी (७०.९० टक्के), आणि भोसरी (८१.८२ टक्के) या तीनही शिधा विभाग कार्यालयांत एकूण २५४९.४५ टन धान्य दाखल झाले आहे.

पुरवठा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दिवाळीच्या सुट्ट्या आणि काही तांत्रिक कारणांमुळे वितरणास विलंब झाला आहे. तसेच, अनेक नागरिक सुट्टीसाठी गावी गेल्याने वाटप बाकी राहिले आहे.

तरीही, शहरातील २५३ दुकानांमधून धान्य वितरण नियमित सुरू आहे. अंत्योदय योजनेंतर्गत ३७१० लाभार्थ्यांना गहू (१० किलो) आणि तांदूळ (२५ किलो) मिळत असून, प्राधान्य कुटुंबांना गहू (२ किलो) आणि तांदूळ (३ किलो) मिळत आहे. उर्वरित लाभार्थ्यांनी ३१ ऑक्टोबरपूर्वी आपले धान्य त्वरित उचलण्याचे आवाहन पुरवठा विभागाने केले आहे.

ज्वारी‘चा बोनस! प्रत्येक पात्र कुटुंबाला दोन महिन्यांच्या कालावधीत एक किलो ज्वारी मोफत मिळणार असल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे

error: Content is protected !!
Exit mobile version