गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे पीएमपीच्या वातानुकूलित ई-बसेसने आयटीयन्सना दिली ‘गारेगार’ प्रवासाची भेट!

पीएमपीच्या वातानुकूलित ई-बसेसने आयटीयन्सना दिली ‘गारेगार’ प्रवासाची भेट!

पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील आयटी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (PMPML) च्या वातानुकूलित ई-बस सेवेला आयटी क्षेत्राकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. विशेषतः माण-हिंजवडी आगाराने अवघ्या चार महिन्यांत तब्बल १२ लाख प्रवाशांना सेवा देत, उत्पन्नाचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.

१ मे २०२५ रोजी सुरू झालेल्या या आगाराच्या ३२ ई-बसेसनी हिंजवडीतील आयटी पार्क आणि शहराच्या विविध भागांना जोडले आहे. सुरुवातीपासूनच या बसेसला मिळणारा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. मे महिन्यात ३ लाख १६ हजार प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेतला, तर त्यानंतरच्या महिन्यांमध्येही ही संख्या ३ लाखांच्या पुढे स्थिर राहिली. यावरून, आयटी कर्मचाऱ्यांनी खासगी वाहनांऐवजी वातानुकूलित बसला पसंती दिली आहे, हे स्पष्ट होते.

केवळ प्रवासी संख्याच नाही, तर उत्पन्नाच्या बाबतीतही या आगाराने चांगली कामगिरी केली आहे. मे महिन्यात ६१ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले, तर जुलै आणि ऑगस्ट महिन्यात हे आकडे ९६ लाख रुपयांच्या पुढे गेले.

पंपमएलच्या या सेवेने प्रवाशांची सोय तर झालीच, पण याव्यतिरिक्त प्रवाशांना थेट व्हॉट्सअॅप ग्रुपद्वारे पीएमपीसोबत संवाद साधण्याची संधीही मिळाली आहे. यामुळे प्रवाशांच्या सूचना आणि तक्रारी ऐकून घेऊन, बसच्या वेळापत्रकात आवश्यक ते बदल करण्यात आले आहेत. प्रवाशांसोबतचा हा थेट संवादच या सेवेच्या यशाचे एक मोठे कारण आहे, असे पीएमपीचे जनसंपर्क अधिकारी किशोर चौहान यांनी सांगितले.

या यशाने हे सिद्ध झाले आहे की, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत अत्याधुनिक सुविधा आणि प्रवाशांशी थेट संवाद साधल्यास, ती अधिकाधिक लोकप्रिय होऊ शकते.

न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे

error: Content is protected !!
Exit mobile version