गोल पोस्ट महाराष्ट्र कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची पणती शीतल महाजन ठरली एव्हरेस्ट शिखरावर स्कायडायव्हींग करणारी...

कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची पणती शीतल महाजन ठरली एव्हरेस्ट शिखरावर स्कायडायव्हींग करणारी जगातील पहिली महिला

जळगाव, २० नोव्हेंबर २०२३ : समुद्र सपाटीपासून उंच असलेल्या बर्फाळ एव्हरेस्ट पर्वताच्या डोंगर रांगावर स्कायडायव्हिंग करून, कवयित्री बहिणाबाई चौधरींची पणती पद्मश्री शीतल महाजन हीने तीचे स्वप्न पूर्ण केले. यासोबतच तीच्या नावावर अनेक जागतीक विक्रमांच्या नोंदीही झाल्यात. एव्हरेस्ट शिखरावर स्कायडायव्हींग करणारी ती जगातील आणि भारतातील पहिली महिला ठरली आहे.

शीतलच्या या मोहिमेची सुरवात ११ नोव्हेंबरपासून झाली. यादिवशी तीने हिमालयातील एव्हरेस्ट प्रदेशात एकूण ४ पॅराशूट जम्प केल्या. तीने ५००० फुटापासून सुरवात करत १७५०० फुट उंचीवरून पहिली पॅराशूट उडी घेतली आणि १२५०० फुटावरील विमानतळावर उतरली. या उडीत न्यूझीलंडमधील दिग्गज स्कायडायव्हर ‘वेंडी स्मिथ’ हे तीचे प्रशिक्षक विमानात होते.

पहिल्या उडीत तीने उत्तर ध्रुव, दक्षिण ध्रुव आणि जगातील तिसरा ध्रुव म्हणजेच माउंट एव्हरेस्ट स्कायडायव्हिंग करणारी जगातील पहिली महिला म्हणून जागतिक रेकॉर्ड केले. यासोबतच माउंट एव्हरेस्ट समोर स्कायडाइव्ह करणारी पहिली भारतीय नागरी महिला म्हणून राष्ट्रीय रेकॉर्ड तीने केला. दुसरी उडी १२ नोव्हेंबर २०२३ रोजी घेतली. त्यासाठी तीने विमानतळावरून उड्डाण केले. ८००० फुट उंचावरून भारतीय ध्वजासह स्कायडायव्हिंगची उडी दिग्गज कॅमेरावुमन वेंडी स्मिथ आणि रशियातील कॅमेरा वुमन नादिया सोलोव्येवा यांच्यासमवेत घेतली. या उडीत तीने भारतीय राष्ट्रध्वजासह स्कायडायव्हिंग करणारी पहिली महिला म्हणून राष्ट्रीय विक्रम नावावर नोंदवला. तीसरी उडी २३००० फुटांवरून अमादाब्लम माउंटन बेस कॅम्पवर घेतली. स्कायडायव्हिंग करत ती ४६०० १५०९१ फूट उंचीवर उतरली. या उडीमध्ये फ्रान्समधील प्रसिद्ध स्कायडायव्हर पॉल हेन्री डी बेरे हे तीचे स्कायडायव्हिंग प्रशिक्षक होते.

माऊंट एव्हरेस्टच्या समोर २१००० फुटावर उडी घेवून स्कायडायव्हिंग करण्याचे तीचे स्वप्न १३ नोव्हेंबरला पूर्ण झाले. एव्हरेस्टवरील कालापत्थर या १७४४४/५३१७ येथे सर्वोच्च उंचीवर उतरले. या उडीत पॉल हेन्री डी बेरे हे तीचे प्रशिक्षक होते. या उडीत तीने सर्वात उंच स्कायडायव्हिंग लँडिंग करणारी आणि कालापत्थर येथे माउंट एव्हरेस्ट समोर स्कायडायव्ह करणारी पहिली भारतीय महिला म्हणून जागतिक विक्रम नोंदवला.

शीतलला या मोहिमेसाठी दिग्गज स्कायडायव्हर प्रशिक्षक पॉल हेन्री डी बेरे, ओमर अलहेगेलन, वेंडी स्मिथ, नादिया सोलोव्येवा, एक्सप्लोर हिमालयाचे संस्थापक ,स्कायडायव्हर सुमन पांडे, अनुज पांडे, या मोहिमेचे प्रायोजक रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक नीता अंबानी, अनंत अंबानी, गिरीश यांचे सहकार्य मिळाले असल्याचे शीतल सांगते.

मीडियाशी बोलताना तीने सांगितले, की १३ नोव्हेंबर रोजी मी माऊंट एव्हरेस्टच्या समोर २१५०० फूट उंचीवरून माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम उडी मारली. या सर्व उडीतून मी अनेक जागतीक व राष्ट्रीय विक्रमांची माझ्या नावावर नोंद केली. एव्हरेस्ट प्रदेशातील अत्यंत पर्वतीय वातावरणात स्कायडायव्हिंग करणे हे एक मोठे आव्हान होते. प्रत्येक उडी आपल्यासोबत अतिरिक्त जोखीम आणते. पण जिद्द आणि इच्छाशक्तीच्या जोरावर आतापर्यंत केलेल्या सर्वोच्च उंचीवरील उडींपैकी ही एक असल्याचे तीने ‌सांगितले. तिच्या या मोहिमेचे जगभरात कौतुक होत आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : डॉ.पंकज पाटील

error: Content is protected !!
Exit mobile version